रहिवाशांना अवघ्या दोन वर्षांत घरे देऊ
रहिवाशांना अवघ्या दोन वर्षांत घरे देऊ
घाटकोपरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : वर्षानुवर्षे रखडलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून पूर्ण केला जाणार असून, त्याचे भूमिपूजन मंगळवारी (ता. १४) करण्यात आले. ‘हे केवळ घरांच्या उभारणीचे भूमिपूजन नाही, तर सर्वसामान्यांच्या पूरिपूर्ण घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे. ‘एमएमआरडीए’च्या नियोजनानुसार संबंधित रहिवाशांना तीन वर्षांत घरे मिळणार असली तरी आम्ही ती अवघ्या दोन वर्षांत देणार आहोत,’ अशी घोषणा या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगर येथील सुमारे ३२ हेक्टर जागेवर झोपडपट्टी वसली असून, त्यामध्ये सुमारे १७ हजार झोपड्या आहेत. त्याच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीए प्रथमच विकसकाच्या भूमिकेत असून ‘एसआरए’ प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण म्हणून काम करीत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ४,३४५ झोपड्यांचे पुनर्वसन प्रस्तावित असून, त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते पार मंगळवारी करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की रहिवाशांनी घरे रिकामी केल्याशिवाय प्रकल्पाचे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळेच रहिवाशांना वर्षभरापूर्वी दोन वर्षांचे आगाऊ भाडे देण्यात आले. रहिवाशांना वेळेत घर मिळावे म्हणून काम निश्चित केलेल्या वेळेच्या आधी पूर्ण केले जाईल. गेल्या साडेचार दशकांपासून येथील झोपडीत राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचे दर्जेदार सुविधा असलेले घर देण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकली आहेत. या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री ॲड. आशीष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार राम कदम, मिहिर कोटेचा, पराग शहा, ‘एमएमआरडीए’चे आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते.
प्रत्येकाला मोफत घर
सध्या आडवी असलेली झोपडपट्टी उभ्या स्वरूपात उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर त्यांना सर्व सोयीसुविधा दिल्या तरच त्याला विकास म्हणता येईल. त्यासाठी आम्ही कार्यरत असून, मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी आम्ही क्लस्टर पुनर्विकास हाती घेत आहोत. त्याचाच भाग म्हणून मोठ्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाला मोफत घर देणे, हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट असून, त्याची सुरुवात धारावीतून केल्याचे त्यांनी सांगितले.
तुमच्या विश्वासाला पात्र ठरू!
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी येथील झोपड्या रिकाम्या करणे आवश्यक होते. त्यासाठी आमच्या सरकारवर विश्वास ठेवून तुम्ही घरे रिकामी केली. त्यामुळे तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला आम्ही निश्चितच पात्र ठरू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतानाच तयार होणाऱ्या घरांच्या उद्घाटनालाही मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार येऊ, असेही सांगितले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादर येथे उभारण्यात येत आहे. त्यातच आता रमाबाई नगरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेतून माता रमाबाई आंबेडकर यांचेही स्मारक उभारले जाईल. गेल्या ४० वर्षांपासून येथील लोक कठीण परिस्थितीत जगत आहेत. आज त्यांचा खडतर प्रवास संपला आहे. पुढील तीन-चार वर्षांत १७ हजार कुटुंबांचे आयुष्य उजळून निघेल. दिवाळी पुढच्या आठवड्यात असली तरी या रहिवाशांची खरी दिवाळी आजच साजरी झाली आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
हजारो कुटुंबांच्या स्वप्नाचा पाया
रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन म्हणजे येथील हजारो रहिवाशांच्या स्वप्नातील घराचा पाया आहे. त्यांना नुसत्या चार भिंतींचे घर नव्हे, तर वरळी बीडीडीतील रहिवाशांना जशी घरे दिली आहेत तशीच घरे येथील रहिवाशांना मिळणार आहेत. रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी ही संघर्ष आणि त्यागाची, श्रमाची भूमी आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.