दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून डोंबिवलीत वाद
डोंबिवलीत दिवाळी स्टॉलवरून वाद
परप्रांतीय महिलांकडून मराठी महिलांना अरेरावी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवर दिवाळीच्या साहित्याचा स्टॉल लावण्यावरून परप्रांतीय फेरीवाला महिला आणि श्रीवल्ली फाउंडेशनच्या मराठी महिलांमध्ये वाद झाला. स्टॉलसाठी जागा खाली करण्यास नकार देत परप्रांतीय महिलांनी फाउंडेशनच्या महिलांना अरेरावी केली आणि ‘मराठी’ असण्यावरून हिणवले, असा गंभीर आरोप श्रीवल्ली फाउंडेशनच्या रेखा रेडकर यांनी केला आहे. तसेच या महिलांनी भररस्त्यात अंगावर पेट्रोल ओतून गोंधळ घातल्याचेही सांगण्यात आले. अखेर पोलिस आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद शांत झाला.
डोंबिवली पश्चिम येथील घनश्याम गुप्ते रोडवर हरिओम मोबाईल दुकानासमोर श्रीवल्ली फाउंडेशनला १३ ते १९ ऑक्टोबर या कालावधीसाठी दिवाळी साहित्याचे स्टॉल (तात्पुरत्या स्वरूपात) लावण्याची परवानगी महापालिकेकडून देण्यात आली आहे. फाउंडेशनच्या महिला गेल्या दोन दिवसांपासून स्टॉलसाठी मंडप टाकण्याकरिता जागा पाहत होत्या. या वेळी येथील कायमस्वरूपी फुल-फळ विक्रेत्या परप्रांतीय महिलांनी त्यांना रस्त्याच्या कोपऱ्यावर मंडप टाकण्यास तीव्र विरोध केला. ‘‘आम्ही अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहोत, तुम्ही येथे स्टॉल लावायचा नाही,’’ असा हेका त्यांनी धरला. या वेळी परप्रांतीय महिलांनी मराठी महिलांना उद्देशून अत्यंत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप रेखा रेडकर यांनी केला आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, ‘‘त्या महिलांनी आम्हाला ‘तुम्ही मराठी माणसं पाकीट चोर आहात, आमच्या पायाखालचे आहात’ असे म्हणत हिणवले.’’
फाउंडेशनने स्टॉलसाठी पालिकेची रीतसर परवानगी घेतली असून, परवाना शुल्कही भरले आहे. तरीही स्टॉलसाठी जागा मिळत नसल्याने रेडकर यांनी संताप व्यक्त करत, ‘‘आम्ही मराठी माणसांनी व्यवसाय करायचा नाही का? यांना कायमची जागा कोणी दिली? हे पालिका कर्मचाऱ्यांना हप्ता देतात, पण आम्ही रीतसर परवाना भरला आहे, मग आम्ही कोणाकडे दाद मागायची,’’ असा सवाल उपस्थित केला.
पेट्रोल ओतून गोंधळ
वाद विकोपाला गेला असता, काही परप्रांतीय महिलांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत भररस्त्यात तमाशा घातला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ‘ह’ प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक प्रमुख विजय भोईर व कर्मचारी, तसेच विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे व इतर पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद शांत केला.
फेरीवाला प्रश्न जटिल
डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. नुकताच, पूर्वेकडील रेल्वेस्थानकाबाहेर फेरीवाल्यांमुळे एक रुग्णवाहिका अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. न्यायालयाचा आदेश असूनही (रेल्वेस्थानकपासून १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई) फेरीवाले सर्रास बसत आहेत. या समस्येवर मनसे नेते राजू पाटील यांनीही नुकतेच ट्विट करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
फेरीवाल्यांची जागा बाजूला आहे, दोघांनाही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टॉलच्या ठिकाणी असलेले फेरीवाले हे हटविण्यात आले आहेत.
- विजय भोईर, फेरीवाला हटाव पथक प्रमुख, ह प्रभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.