दिवाळीच्या मुहूर्तावर अंबरनाथवासियांना नाट्यगृहाची भेट
दिवाळीच्या मुहूर्तावर अंबरनाथवासीयांना नाट्यगृहाची भेट
१९ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
अंबरनाथ ता. १५ (वार्ताहर) : दिवाळीच्या प्रकाशमय उत्सवात यंदा अंबरनाथ शहरात एक अनमोल सांस्कृतिक दीप प्रज्वलित होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अथक पाठपुराव्याने आणि पुढाकाराने उभारण्यात आलेल्या अंबरनाथ नाट्यगृहाचे लोकार्पण रविवारी (ता. १९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मराठी कलाविश्वातील नामवंत दिग्दर्शक, अभिनेते आणि संगीतकार अंबरनाथनगरीत उपस्थित राहणार आहेत. अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान येथे उभारलेल्या या नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर आठ दिवस सुप्रसिद्ध नाटकांच्या विशेष प्रयोगांचेदेखील आयोजन केले आहे. तर नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या सही रे सही या लोकप्रिय नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले आहे.
लोकार्पण सोहळ्याला मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील मान्यवर ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, महेश मांजरेकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर, अभिनेते मकरंद अनासपुरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार आणि संतोष जुवेकर यांसारखे लोकप्रिय कलाकारही या सोहळ्याची शोभा वाढवतील. मराठी संस्कृती, नाट्यकला आणि संगीत क्षेत्रातील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने अंबरनाथचा हा लोकार्पण सोहळा एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शहरात आधीच रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ग्रंथालये, अभ्यासिका, उद्याने आणि पायाभूत सुविधा उभारल्यानंतर आता या नाट्यगृहाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रातही नवा अध्याय सुरू झाला आहे. या नाट्यगृहामुळे अंबरनाथ आणि परिसरातील रसिकांना कल्याण किंवा डोंबिवली गाठण्याची गरज आता उरणार नाही. अंबरनाथ शहरातच विविध नाटकांची अनुभूती नागरिकांना घेता येणार आहे. अंबरनाथचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला नाट्य, संगीत, कला यांचा अनुभव देण्यासाठी हे नाट्यगृह निश्चितच एक महत्त्वाची वास्तू ठरणार आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान परिसरात उभारलेले हे आधुनिक नाट्यगृह केवळ एक इमारत नाही, तर शहराच्या संस्कृतीचे प्रतीक ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कल्पकदृष्टीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे नाट्यगृह आकाराला आले आहे. अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, आकर्षक आणि प्रशस्त रंगमंच, सुमारे ६५८ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था असलेले हे नाट्यगृह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील एक अभिमानास्पद सांस्कृतिक वास्तू ठरणार आहे. तसेच यात दोन छोटी सभागृहे, प्रदर्शन कक्ष, कार्यशाळा सभागृह, ग्रीन रूम, क्राय रूम, उपाहारगृह आणि भव्य पार्किंगची सुविधा असल्याने हे नाट्यगृह सर्वार्थाने बहुउद्देशीय ठरणार आहे.
आठ दिवसांची मेजवानी
या नाट्यगृहाच्या लोकार्पणानिमित्त नाट्यरसिकांसाठी आठ दिवसांचा सांस्कृतिक उत्सव साजरा केला जाणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी लोकार्पणाच्या दिवशी भरत जाधव यांच्या लोकप्रिय ‘सही रे सही’ या नाटकाने या सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी - करून गेलो गाव, २१ ऑक्टोबर - आज्जीबाई जोरात, २२ ऑक्टोबर - सखाराम बाईंडर, २३ ऑक्टोबर - संगीत देवबाभळी, २४ ऑक्टोबर - मी वर्सेस मी, २५ ऑक्टोबर - पुरुष आणि २६ ऑक्टोबर - शिवबा ही दर्जेदार नाटके सादर होणार आहेत. वेगवेगळ्या विषयांची, धाटणीची आणि भावविश्वाची ही नाटके रसिकांना नाट्यकलेच्या विविध छटांचा आस्वाद देतील. प्रत्येक प्रयोग दुपारी ४.३० वाजता सुरू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.