बदलापुरातील पुनर्विकासाला गती

बदलापुरातील पुनर्विकासाला गती

Published on

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १५ : एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार बदलापूर शहरातील पुनर्विकासाला गती देण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नगरपालिकेने शहरातील सर्व सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांना नऊ मीटरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शहरातील पुनर्विकासाला गती मिळणार असून, रस्ते रुंद झाल्याने नागरिकांनाही प्रत्यक्ष फायदा होणार आहे.
वर्षभरापूर्वी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर विराजमान झालेले मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. अडचणीच्या ठिकाणांवर व वाहतूक जास्त असलेल्या चौकांमध्ये त्यांनी विस्तार व सुशोभीकरण केले आहे. वर्षभरापासूनच त्यांनी शहरातील रस्ते आणि चौक रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामातून शहरातील १४ चौक रुंद करण्यात आले. चौकातील अनेक जुने अतिक्रमण आणि बांधकाम हटवण्यात आले आहेत. त्यामुळे चौकांमध्ये होणारी कोंडी मोठ्या प्रमाणात सुटली आहे. याच धर्तीवर शहरातील रस्ते रुंद करण्यासाठी पालिकेने सहा मीटर रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यालगतच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला अधिकचे बळ मिळेल. त्यात अधिकचा चटई क्षेत्र निर्देशांक वापरता येईल; तसेच स्वयं पुनर्विकासात रहिवाशांना या निर्णयाचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे.

सिग्नल यंत्रणा कार्यान्वित
वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी काही वर्दळीच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. नागरिकांना या सिग्नल यंत्रणेची अद्याप सवय न झाल्याने अनेकदा काही खटके उडतात; मात्र चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास यामुळे सुरुवात झाली आहे. येत्या काळात चौकातील जुने विद्युत खांब हटल्यानंतर येथील कोंडी पूर्णपणे सुटेल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.


पूररेषेमुळे रखडलेला पुनर्विकास होणार
गेल्या काही वर्षांत उल्हास नदीकिनारी पूररेषा निश्चितीकरणामुळे येथील विकासाला खीळ बसली आहे. रस्ते नऊ मीटर करण्याच्या निर्णयामुळे पुनर्विकासाला गती मिळेल. बांधकाम व्यावसायिक अधिकचे चटई क्षेत्र निर्देशांक घेतील आणि त्याचा पालिकेच्या तिजोरीलाही फायदा होईल. नागरिकांना कमी दरात घरे उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

नऊ मीटरच्या रस्त्यांना मान्यता
एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार आता शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते इतिहासात जाणार आहेत. आता सर्व रस्त्यांना नऊ मीटरप्रमाणे मान्यता दिली जाईल आणि इमारतींना त्यानुसार बांधकाम परवानगी मिळणार आहे. या आधी व्यावसायिक बांधकामदारांना पालिका किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून रस्ते नऊ मीटर करण्याची मागणी करावी लागायची. प्रशासनाच्या मान्यतेनंतरच त्यावर शिक्कामोर्तब व्हायचा. परंतु आता शहरात सरसकट या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केल्याने शहरातील सर्व रहिवासी आणि व्यावसायिकांना समान फायदे मिळणार आहेत.

यापूर्वी रस्ता रुंदीकरणाबाबत काही प्रकरणे येत होती. आम्ही सरसकट हे धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यावर लवकरच सूचना आणि हरकती मागवून सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात येईल. हा निर्णय प्रत्यक्षात राबवल्यामुळे पुनर्विकास आणि रस्ते रुंदीकरणाला गती मिळेल. भविष्यात वाढणारे बदलापूर शहर आणखीनच सुंदर आणि समृद्ध दिसेल.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com