दिवाळीत सुकामेवा, चॉकलेट हॅम्पर्सला मागणी
दिवाळीत सुकामेवा, चॉकलेट हॅम्पर्सला मागणी
पारंपरिक मिठाईऐवजी आरोग्यदायी, टिकाऊ गिफ्ट्सना प्राधान्य
वाशी, ता. १५ (बातमीदार) : दिवाळी उत्सवात एकमेकांना भेटवस्तू देण्याचा पारंपरिक उत्साह यंदा अधिक आरोग्यदायी आणि टिकाऊ पर्यायांकडे वळला आहे. मिठाईऐवजी सुकामेवा, मखाना चिवडा आणि चॉकलेट हॅम्पर्सना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. सध्या बाजारात आरोग्यदायी भेटवस्तू देण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीसाठी सुकामेवा, चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थ आकर्षक रंगीत आणि डिझाइनिंग बॉक्समध्ये सजवले गेले आहेत. हल्ली सुकामेवा आणि मखाना चिवडा तसेच चॉकलेट यासह विविध हॅम्पर्स तयार केले जातात, जे दीर्घकाळ टिकतात. सुकामेव्याकरिता खास काचेच्या आणि रंगीबेरंगी बरण्यांसह आकर्षक बॉक्स बाजारात दाखल झाले आहेत, ज्यामुळे हे गिफ्ट्स आरोग्यदायी तसेच आकर्षक ठरले आहेत. चॉकलेटच्या हॅम्पर्समध्ये साधे चॉकलेट, सुकामेवा चॉकलेट आणि डार्क चॉकलेट उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी साधे व सुकामेवा चॉकलेट अधिक पसंतीस उतरते, तर मोठ्यांसाठी आणि आरोग्यसचेत ग्राहक डार्क चॉकलेटला प्राधान्य देतात. चॉकलेट बॉक्स ७० रुपयांपासून, तर ड्रायफ्रूट बॉक्स ३२० रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत. मखाना चिवडा व चॉकलेट एकत्रित केलेले कॉम्बो हॅम्पर दीड हजार रुपयांपासून विक्रीस आहेत. विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छांसाठी आकाशकंदील, उटणे, सुकामेवा, मेणपणत्या, फराळ आणि चॉकलेट यांचा समावेश असलेले गिफ्ट बॉक्स देत आहेत. आकर्षक पॅकिंगमुळे हे हॅम्पर्स कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.
................
दिवाळीच्या काळात सुकामेवासारख्या आरोग्यदायी भेटवस्तूंची मागणी लक्षणीय वाढली आहे. विशेषतः मुलांमध्ये रंगीबेरंगी आणि आकर्षक पॅकिंगमुळे चॉकलेट हॅम्पर्सला चांगली पसंती मिळत आहे, असे मिठाई विक्रेते भिबीशन कुमार यांनी सांगितले. या ट्रेंडमुळे पारंपरिक मिठाईला बगल देऊन आरोग्यदायी भेटवस्तूंकडे नागरिकांचा झुकाव वाढला आहे.
...............
पनवेलमध्ये हेल्दी फराळला पसंती
तेलकट पारंपरिक मिठाईला पर्याय, आरोग्यदायी गोडव्याला पसंती
नवीन पनवेल, ता. १५ (बातमीदार) : दिवाळी आता केवळ दिव्यांचा सण न राहता, स्वच्छता, पौष्टिकता आणि आरोग्यदायी गोडव्याचा सणही ठरत आहे. पारंपरिक तळलेल्या, तेलकट मिठाईच्या जागी तेलकटविरहित आणि प्रोटीनयुक्त फराळ पनवेलच्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
तुपातले नाचणी कुकीज, ओट्स बिस्किट्स, ड्रायफ्रूट लाडू, रागी लाडू, बेक शंकरपाळे, बेक चिवडा, मेथी मठरी, ज्वारी व नाचणी चिवडा, फळांपासून बनवलेली मिठाई आणि गाईच्या तुपातील ओल्या नारळाची करंजी अशा विविध पौष्टिक पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. हे पदार्थ फक्त चवीसाठी नव्हे, तर सुरक्षितता, स्वच्छता आणि आरोग्यदायी असण्याच्या कारणामुळे ग्राहकांच्या पसंतीस येत आहेत. अनेक ग्राहक हे फराळ स्वतःसाठी तसेच भेटवस्तू म्हणूनही घेतात. दिवाळीनिमित्त बाजारात फिटनेस-फ्रेंडली आणि पौष्टिक फराळची मागणी लक्षणीय वाढली आहे. या बदलत्या ट्रेंडमुळे मिठाई व्यवसायात नवकल्पना आणि प्रयोग सुरू झाले आहेत. आरोग्य आणि स्वादाचा संगम असलेले हे फराळ आता भेटवस्तूंच्या ट्रेंडमध्येही वरचढ ठरत आहेत. सणात फराळाचा आनंद घेताना लोक आता कॅलरीबद्दल जागरूक झाले आहेत. आरोग्याला प्राधान्य देत, ते उत्साहात या हेल्दी गोड पदार्थांचा अनुभव घेत आहेत, असे विक्रेत्या संपदा गोंधळी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.