बोईसरमध्ये तीन महिन्यात बारा पीडितेवर अत्याचार

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

बोईसरमध्ये तीन महिन्यात बारा पीडितेवर अत्याचार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

Published on

बोईसरमध्ये तीन महिन्यांत १२ पीडितांवर अत्याचार; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
निखिल मेस्त्री
पालघर, ता. १५ : पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी पोलिस ठाणे क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जून ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत लैंगिक शोषणाच्या तब्बल १२ तक्रारींची नोंद झाली आहे. यामुळे बोईसरमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे स्पष्ट होत असून, महिला आणि अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
चोरी, घरफोड्या, मारामाऱ्या, गृहक्लेश, औद्योगिक तक्रारी, खून, आपसातील भांडणे, प्रकरणांचा, आरोपीचा तपास, बंदोबस्त, व्हीआयपी - सरकारी दौरे बंदोबस्त, पारपत्र तपासणी, न्यायालयीन केसेस अशा असंख्य प्रकरणात पोलिस अधिकारी गुरफटल्याने पोलिस ठाणे हद्दीतील कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवर पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याची शक्यता नागरिक वर्तवत आहेत.

गुन्हेगारीचा तपशील : (१ जून ते ३० सप्टेंबर २०२५)
* बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचे (पोक्सो) तीन गुन्हे दाखल. हे तीनही गुन्हे न्यायालयात प्रलंबित
* विनयभंगाचे नऊ ते १० प्रकार घडले असून, त्यात अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाचे दोन गुन्हे नोंद
* महिन्याला एका लहान मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघड
* या सर्व प्रकरणांमध्ये १२ आरोपींना अटक झाली असून, ११ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पोलिसांचे बळ कमी
बोईसर पोलिस ठाणे क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रासह रहिवासी संकुले आहेत. वाढत्या नागरीकरणाने लोकसंख्येत भर पडत आहे. त्यातच पोलिस ठाण्यात तोकडे मनुष्यबळ असल्याने लाखभर लोकसंख्येला ते अपुरे पडत आहे. बोईसरमध्ये गेल्या काही वर्षांत भंगार माफिया, ड्रग्ज पेडलर, वेश्याव्यवसाय, गुटखामाफिया, अमली पदार्थ विक्री करणारे माफिया यासह दादागिरी असे प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. अलीकडे मेफेड्रीन तयार करणारा कारखाना, अमली गुटखा पदार्थाची तस्करी, वेश्याव्यवसाय, बांगलादेशी अशा प्रकारावर पोलिसांनी कारवाया केल्या होत्या. दरम्‍यान, बोईसर पोलिस ठाणे क्षेत्र मोठे आणि विस्तारलेले असल्याने त्याचा भार कमी करण्यासाठी बेटेगाव पोलिस ठाण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे; मात्र हा प्रस्ताव अजूनही मंजूर झालेला नाही. त्यामुळे सध्यातरी मोठ्या लोकसंख्येचा भार बोईसर पोलिसांवर आहे.


१ जून ते ३० सप्टेंबर २०२५
गुन्ह्याचा प्रकार

बलात्कारसह पोक्सो
३ - न्यायालयात प्रलंबित

विनयभंग
७ - न्यायालयात प्रलंबित

विनयभंग पोक्सो
२ पैकी एक न्यायालयात प्रलंबित
एक तपासावर

प्रतिक्रिया :
बोईसर भागात झालेल्या अत्याचाराच्या घटनांची संख्या गंभीर आणि धक्कादायक आहे. बोईसर पोलिस ठाणे क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून हा परिसर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.
- विलास तरे, आमदार, बोईसर विधानसभा

मी, माझ्या मुली, इतर महिला खरंच आम्ही सुरक्षित आहोत का? हा प्रश्न अस्वस्थ करतो. महिलांवरील वाढते अत्याचाराचे प्रमाण, अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार याच्या बोईसर पोलिस ठाण्यात रोज पाचहून अधिक तक्रारी येतात, तर काही पोलिस ठाण्यापर्यंत येऊनही पोहोचत नाही. कारण गुन्हेगारावर कोणत्याही प्रकारची ठोस कठोर कारवाई केली जात नाही. खऱ्या अर्थाने आपण सुरक्षित नाही. कारण कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.
- भावना विचारे, माजी जि. प. सदस्या, शिगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com