‘सत्ता केंद्रा’ला वाचनप्रेरणा देणारे पुस्तकालय
‘सत्ताकेंद्रा’ला वाचनप्रेरणा देणारे पुस्तकालय
मुख्यमंत्र्यांसह नेत्यांच्या वाचनप्रेमाचे साक्षीदार
विनोद राऊत, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालय परिसरात आकाशवाणीपुढील मनोविकास बुक हे वाचनाची भूक भागवणारे एकमेव पुस्तकालय म्हणून ओळखले जाते. १९८४मध्ये सुरू झालेले हे पुस्तकालय वसंतराव, विलासराव ते सुशीलकुमार यांच्यासारख्या वाचनप्रेमी मुख्यमंत्र्यांसह मृणाल गोऱ्हे, ना. धों. महानोर यांचे आवडते ठिकाण राहिले आहे.
नेते, आमदारांच्या गर्दीत वाचनप्रेमींना खुणावणाऱ्या आकाशवाणी आमदार निवासातील मनोविकास बुक स्टॉलचा प्रवासाची एक सुरस कथा आहे. डाव्या चळवळीत सक्रिय असणारे अरविंद पाटकर हे दत्ता सामंत यांच्या संपानंतर पुस्तक व्यवसायाकडे वळले. ते मुंबईतील विविध शासकीय कार्यालये, रुग्णालयांसमोर पुस्तक प्रदर्शन भरवत असत. ‘याचदरम्यान ही जागा माझ्या नजरेस पडली,’ असे पाटकर सांगतात. त्यांनी पुस्तक प्रदर्शनासाठी आकाशवाणी आमदार निवासातील सभागृह मागितले; मात्र वाचनप्रेमी असलेले तत्कालीन अधीक्षक प्रधान यांनी आकाशवाणी कॅण्टीनच्या शेजारील जागा सुचवली.
४ एप्रिल १९८४ला पहिल्यांदा पुस्तक प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनानंतर तुम्हाला मुदत वाढवून हवी का, अशी विचारणा स्वतःहून प्रधान यांनी केली. त्या दिवसानंतर सुरू झालेला पुस्तकालयाचा हा प्रवास आज ४१व्या वर्षापर्यंत पाेहाेचत आहे. या बुक स्टॉलची मुदतवाढ मिळवण्यात संपादक कुमार केतकर, अरुण साधू, माधव गडकरी, ना. धों. महानोर व रा. सू. गवई यांनी मोलाची मदत केल्याचे पाटकर यांनी सांगितले.
मंत्रालयात विविध कामांसाठी येणारे बहुतांश चहा-नाश्त्यासाठी आमदार निवासाच्या कॅण्टीनमध्ये येतात. बाजूला असलेले हे पुस्तकालय त्यातील वाचकप्रेमींना खुणावते. १९८४ला अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, शरद जोशी यांची पुस्तके अतिशय लोकप्रिय होती. दलित साहित्यालाही मोठी मागणी होती, असे दीड दशकापासून पुस्तकालयाचे व्यवस्थापन सांभाळणारे हिरवे यांनी सांगितले.
वाचनप्रेमी मुख्यमंत्री
मुख्यमंत्री विलासराव देशमुख, वसंतराव नाईक, शिवाजीराव निलंगेकर पाटील, सुशीलकुमार शिंदे हे या पुस्तकालयाचे नियमित वाचक होते. निलंगेकर, विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना येथून पुस्तके विकत घेतली आहेत. १९८५ ते २००५पर्यंत बहुतांश आमदार हे पुस्तक घेण्यासाठी येत. यामध्ये आमदार ना. धों. महानोर, बबनराव पाचपुते, शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, मृणाल गोऱ्हे, कुमार सप्तर्षी, रामदास आठवले, छगन भुजबळ, श्रीकांत जिचकार यांचा समावेश होता, असे हिरवे म्हणाले.
नव्या दमाचे वाचक
मंत्री नरहरी झिरवळ हे दरआठवड्याला न चुकता भेट देतात किंवा पुस्तक मागवतात. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री आशीष शेलार, कपिल पाटील यांचेही पुस्तकप्रेम आजदेखील कायम आहे. आमदार अमोल मिटकरी, दीपक केसरकर, निरंजन डावखरे, रोहित पवार, किरण लहामटे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार राजाभाऊ वाजे हेही नियमितपणे या स्टॉलवरून पुस्तके खरेदी करतात. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, कैलाश पगारे असे अनेक सनदी अधिकारीही नियमित वाचक असल्याचेही हिरवे यांनी अभिमानाने सांगितले.
...
गेल्या दोन वर्षांपासून मी येथे येतो. पहिले पुस्तक चाळतो, मग विकत घेतो.
- सुयश ढोले, पोलिस अधिकारी
..
२० वर्षांपासून मी नियमित वाचक आहे. कामाच्या निमित्ताने मी जेव्हाही मंत्रालयात येतो तेव्हा चार ते पाच नवीन पुस्तके घरी नेतो.
- शिवाजी काळे, बुलडाणा
...
तीन वर्षांपासून मी नियमित वाचक आहे. वेळ मिळाला की येथे पुस्तकांचे वाचन करतो आणि महिन्याला तीन ते चार पुस्तके खरेदी करतो.
- पोपट गळगटे, कक्ष अधिकारी, मंत्रालय
..
आज मोबाईलचा जमाना आहे. त्यामुळे वाचन करणाऱ्यांची संख्या थोडी कमी झाली असली तरी आमचे वाचक घटलेले नाहीत.
- मनोज हिरवे, व्यवस्थापक, मनोविकास बुक सेंटर
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.