एशियाटिकमध्ये रेकॉर्डब्रेक अर्ज
‘एशियाटिक’च्या सदस्यत्वासाठी अर्जांचा पाऊस
व्यवस्थापन समितीची निवडणूक गाजणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः दोन शतकांहून अधिक प्रदीर्घ इतिहास असलेली एशियाटिक सोसायटी यंदा नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. २२१ वर्षांच्या कार्यकाळात केवळ साडेतीन हजार सभासद जोडलेल्या या संस्थेकडे यंदा नव्याने सदस्यत्वासाठी जवळपास १,२०० अर्ज आले आहेत. मागील दोन दिवसांतच सुमारे ६०० अर्ज दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये होणारी व्यवस्थापन समितीची निवडणूक या वेळी सर्वार्थाने गाजण्याची दाट शक्यता आहे.
१८०४ मध्ये ब्रिटिशांनी मुंबईत एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. साडेतीन लाख पुस्तके, दुर्मिळ नाणी, नकाशे, हस्तलिखिते, मूळ पुस्तकांच्या प्रती, बुद्घांचे भिक्षापात्र असा अनमोल खजाना असलेली एशियाटिक सोसायटी हे मुंबईचे वैभव समजले जाते; मात्र अलीकडे निधीअभावी ग्रंथालयाचा डोलारा कोसळत चालला आहे. दुसरीकडे एशियाटिकचे व्यवस्थापन ताब्यात घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. एशियाटिकच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक सदस्य नोंदणी मागील चार महिन्यांत झाली. गेल्या काही वर्षांत नव्या सदस्य नोंदणीची वार्षिक आकडेवारी १०० किंवा १५०च्या पलीकडे गेली नाही; मात्र यंदा एप्रिलपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत १,२०० हून अधिक नोंदणी अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची पडताळणी करताना व्यवस्थापन समितीची चांगलीच दमछाक होत आहे. संस्थेत २५ कर्मचारी कार्यरत असून, अर्ज हाताळण्यासाठी एकच कर्मचारी आहे. त्यास मदतनीस म्हणून बाहेरून लोक आणावे लागले. मागील महिनाभरात आलेल्या अर्जांची गुरुवारी छाननी केली जाणार आहे.
...
अर्जांची छाननी होणार
अर्ज भरण्याचा बुधवार (ता. १५) हा शेवटचा दिवस होता. या दिवशी ३५०हून अधिक अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे अनेक फॉर्म एकगठ्ठा आले आहेत. यातील अनेकांनी अर्धवट, चुकीचा पत्ता भरला आहे, तर काही दुसऱ्याने भरल्याचा संशय व्यवस्थापन समितीला आहे. त्यामुळे छाननीत असे अर्ज फेटाळले जाण्याची शक्यता आहे.
...
यंदा संस्थेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक अर्ज आले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही अर्ज आल्याचा संशय आहे. हे चित्र एशियाटिकसारख्या संस्थेसाठी चांगले नाही.
- विस्पी बालापोरीया, अध्यक्ष, एशियाटिक सोसायटी, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.