मतदारांची दिवाळी धुमधडाक्यात
मतदारांची दिवाळी धूमधडाक्यात
भेटवस्तू, फराळ वाटपातून उमेदवारांची जनसंपर्क मोहीम
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिवाळीचा सण आणि निवडणूक प्रचाराचा समन्वय साधत इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्याच्या मोहिमेला वेग दिला आहे. मतदारांशी आत्मीयतेचा संबंध जोडण्यासाठी आकर्षक भेटवस्तू वाटप, वस्तू आणि सेवांवर सवलती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आधार घेतला जात आहे.
राजकीय नेते, पदाधिकारी आणि इच्छुकांनी सणाचे निमित्त साधून महिला मंडळे, युवक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ आणि रहिवासी संस्थांशी भेटीगाठींचे नियोजन केले आहे. अनेक ठिकाणी फराळ समारंभ, किल्ले बनवणे व रांगोळी स्पर्धा, तसेच सन्मान सोहळ्यांचे आयोजन करून राजकीय नेते आपली उपस्थिती दर्शवत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मिठाईचे बॉक्स, आकाशकंदील, रांगोळीचे साहित्य, दिवे, उटणं, स्टिकर आणि घरगुती वस्तू अशा विविध आकर्षक भेटवस्तूंच्या माध्यमातून मतदारांना ‘दिवाळी बोनस’ दिला जात आहे. याशिवाय, मोफत धान्य, दिवाळी फराळाचे किराणा साहित्य आणि तयार फराळाचे वाटपही सुरू आहे. विशेष म्हणजे, टीव्ही, फ्रीज, एसी, कुलर, टू व्हीलर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करून शहरात स्टॉल्स आणि मंच उभारले गेले आहेत.
समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा पूर
प्रचारासाठी समाजमाध्यमांचा वापरही वाढला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर उमेदवारांच्या शुभेच्छा संदेशांचे फोटो आणि व्हिडिओ अक्षरशः ओसंडून वाहत आहेत. शुभेच्छांच्या नावाखाली प्रचार संदेश दिले जात असून, शहरात बॅनर, पोस्टर आणि होर्डिंगची मोठी रेलचेल दिसत आहे.
प्रचाराची धार तीव्र
सत्ताधारी असोत वा विरोधक, दोन्ही बाजूचे नेते मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. नागरिकांशी जवळीक साधण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमा आता थेट निवडणुकीच्या प्रचाराच्या दिशेने वळू लागल्या आहेत. दिवाळीच्या उत्साहात निवडणुकीच्या माहोलचाही रंग मिसळल्याने शहरात सणासोबतच राजकीय धूम पाहायला मिळत आहे.
प्रचारातील मुख्य आकर्षणे
मिठाई, सजावटीचे साहित्य, दिवे, कंदील आणि भेटवस्तूंचे वाटप
फराळ समारंभ, किल्ले आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन
मोफत धान्य, तयार फराळ, दिवाळी किराणा साहित्याचे वाटप
टीव्ही, फ्रिज, एसी, कूलर, टू-व्हीलर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत सूट
सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश आणि प्रचाराच्या व्हिडिओंचा पूर
मतदारांशी आत्मीय संबंध जोडण्याचा उमेदवारांचा प्रयत्न
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.