ऑनलाइन कामाचा वाढता बोजा

ऑनलाइन कामाचा वाढता बोजा

Published on

पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १६ : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विविध विभागांतर्गत ऑनलाइन माहिती भरण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरकार अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दररोज माहिती भरणे आणि अद्ययावत करणे हे शिक्षकांच्या दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग बनले आहे. परंतु या सतत वाढत्या ऑनलाइन कामामुळे मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक व कर्मचारी हैराण झाले आहेत. याचा अध्यापनाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि प्रधान सचिव रणजीतसिंग देओल यांच्याकडे निवेदन देऊन शिक्षकांचा ताण कमी करण्याची मागणी केली आहे.
सध्या शिक्षकांना यूडीएसई पोर्टलवरील आधार वैधता, ड्रॉप बॉक्स अपडेट, विद्यार्थी इम्पोर्ट, सरल पोर्टलवर विषयनिहाय माहिती, निपुण महाराष्ट्र अंतर्गत अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध, ईको क्लब व शाळा सुरक्षितता अहवाल, लोकेशनसह शाळा मॅपिंग, १०० कोटी वृक्ष लागवड, विविध शिष्यवृत्ती योजना, नॅशनल बिल्ड कॉन २०२५ नोंदणी, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क, आनंददायी शनिवार उपक्रम, प्रशिक्षण व्यवस्थापन प्रणाली, तमन्ना टेस्ट/सायकोमेट्रिक टेस्ट, आयसीटी/रोबोटिक्स प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, शालेय पोषण आहार, दीक्षा ॲप, उल्हास ॲप, आणि सरकारच्या विविध योजना यांसारख्या शेकडो पोर्टल्सवर डेटा भरण्याचे काम करावे लागते, असे घागस यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शारीरिक व्याधी
सततच्या ऑनलाइन कामामुळे शिक्षकांचा अध्यापनाकडे लक्ष कमी होत असून, अनेक जण मानसिक आणि शारीरिक ताणाखाली काम करत आहेत. काही शिक्षकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजारही जडत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले आहे.

तज्ज्ञांची समितीसाठी प्रस्ताव
शिक्षकांच्या या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी निवडक तज्ज्ञांची समिती स्थापन करून, वर्षभरातील सर्व ऑनलाइन कामे एकाच वेळी, प्रवेश प्रक्रियेच्या वेळी पूर्ण करण्याचा प्रस्ताव संघटनेने सरकारकडे मांडला आहे. यामुळे वर्षभर शिक्षकांना सततच्या ताणातून मुक्तता मिळेल. या सर्व बाबींचा विचार करत घागस यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, सचिव देओल यांच्याकडे निवेदनाद्वारे शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवरील ऑनलाइन कामाचा ताण व भार कमी करण्याची मागणी केली आहे.

अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम
पूर्वी शिक्षक शाळेत येण्याआधीच विद्यार्थ्यांसाठी काय शिकवायचे याची पूर्वतयारी करून येत. मात्र, आता त्याच शिक्षकाला शाळेत येताना ऑनलाइन कामांची धास्ती घ्यावी लागते. डेटा भरणे हे ऑनलाइन काम जरी अत्यावश्यक असले, तरी त्याला मर्यादा असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वाढत्या कामामुळे शिक्षकांचे मूळ काम अध्यापन बाजूला राहत आहे. परिणामी, अध्यापनाच्या मूळ गुणवत्तेवर परिणाम होतो, असे घागस यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com