फटाक्यांमुळे पशु-पक्ष्यांना दिवाळी नकोशी!
फटाक्यांमुळे पशु-पक्ष्यांना दिवाळी नकोशी!
काळजी घेण्याचे पर्यावरणप्रेमींचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा उत्सव, पण या उत्साहाच्या दरम्यान आपल्या आजूबाजूला असणारे पशु-पक्षी मात्र फटाक्यांच्या आवाजाने त्रस्त होतात. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे अनेक प्राणी घाबरून पळून जातात, जखमी होतात आणि काही वेळा मृत्युमुखीही पडतात.
मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू यांच्या म्हणण्यानुसार, कुत्रे, मांजरे, पक्षी आणि इतर प्राण्यांचे ऐकण्याचे सामर्थ्य माणसांपेक्षा अनेक पटींनी अधिक संवेदनशील असते. फटाक्यांचा अचानक होणारा तीव्र आवाज त्यांच्या कानांवर मोठा धक्का देतो. त्यामुळे ते घाबरून पळ काढतात, स्वतःला इजा पोहोचवतात किंवा तणावग्रस्त होतात. कावळे, पोपट, कबुतर, चिमण्या यांसारखे पक्षी रात्री फटाके वाजल्याने घाबरतात आणि झाडांवरून उडतात. अंधारात दिशाभूल झाल्यामुळे अनेक पक्षी इमारतींना धडकून जखमी होतात.
प्राणीसंवर्धन संस्थांचा इशारा
मुंबईतील रेस्क्यू असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या संस्थेचे प्रमुख पवन शर्मा यांनी नागरिकांना आवाजाशिवाय दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आपण काही क्षणांचा आनंद घेतो, पण या आनंदाची किंमत मुक्या जीवांना भोगावी लागते. त्याचा विचार आपण दिवाळी साजरी करताना करायला हवा, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक इमारतीत, सोसायटीत किंवा कॉलनीत फटाक्यांच्या वेळा मर्यादित ठेवणे आणि मोठ्या आवाजाचे फटाके टाळणे हे लहानसे पाऊल मोठा फरक घडवू शकते.
पशु-पक्ष्यांना सुरक्षित ठेवा!
फटाक्यांच्या आवाजाने कुत्र्यांमध्ये भीती, कंप, हृदयगती वाढणे, उलट्या किंवा आक्रमक वर्तन दिसते. त्यामुळे दिवाळीत त्यांना घरात सुरक्षित ठेवावे, खिडक्या बंद ठेवाव्यात आणि त्यांच्याशी शांतपणे बोलून त्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन पशुवैद्य डॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी केले आहे.
धूर आणि आवाज यामुळे केवळ प्राण्यांनाच नव्हे, तर वायुप्रदूषणामुळे माणसांनाही त्रास होतो. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी फटाके न वाजवता दिवे, फुलबाज्या आणि नैसर्गिक सजावटीने दिवाळी साजरी करा, असे आवाहन आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमेरा अब्दुल्ली यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारचे फटाके फोडणे हे प्रदूषणच आहे. ते टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे लक्षात ठेवा
* मोठ्या आवाजाचे फटाके टाळा
* प्राण्यांना सुरक्षित जागा द्या
* रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांवर किंवा पक्ष्यांवर फटाके फेकू नका
* मुलांना संवेदनशीलतेचे शिक्षण द्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.