गैरव्यवस्थापनाचा कारभार
मनोर, ता. १६ (बातमीदार) : महामार्गावर वाहतूक कोंडीची उद्भवलेली परिस्थिती गैरव्यवस्थापनाचा प्रकार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देत कोंडीमुक्त महामार्ग करण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला महामार्ग वाहतूक पोलिस, मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त, तसेच मिरा-भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. वाहतूक कोंडीमुळे अधिकाऱ्यांबाबतीत नकारात्मक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे बुधवारी (ता. १६) आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई येथून निघालेला पालकमंत्री गणेश नाईक यांचा ताफा सकाळी ७ वाजता घोडबंदर भागातीळ कोंडीत अडकला होता. अखेर रो-रो सेवेचा आधार घेत नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा पालकमंत्री पालघरमध्ये पोहोचले. घोडबंदरपासून पालघरच्या दिशेने प्रवास करताना कोंडीतून मार्ग काढताना नियोजन समितीच्या बैठकीला पोहोचू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वसई फाट्यावरून वसईच्या दिशेने वळण घेतले. वसई आणि नालासोपारा शहरातून येथून प्रवास करीत विरारची मारंबळ पाडा जेट्टी गाठली. टेंभी खोडावे येथून रस्त्यामार्गे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पालघर पूर्वेकडील शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले होते. वाहतूक कोंडीदरम्यान महिला आणि मुलांची गैरसोय टाळण्यासाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्याच्या सूचना वसई-विरार महापालिकेला देण्यात आल्या आहेत. कुणालाही दोष न देता भविष्यात जनतेला सोयीसुविधा मिळतील, याबाबत पालकमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
वाहतूक कोंडीच्या अपयशाला धनी कोणीही होत नाही. कोंडीमुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत नकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होता कामा नये, यासाठी अधिकाऱ्यांना तंबी दिली. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत झाडे लावण्याची जबाबदारी वन विभागाकडे देण्यात आली आहे. सप्तरंगी फुलझाडे लावण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.
रस्ता दुरुस्तीची सबब
ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटातील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे कोंडी झाल्याची माहिती मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्त कार्यालयातील वाहतूक शाखेच्या सहायुक्तांनी दिली, परंतु नवी मुंबईला माघारी जाताना तरी महामार्ग वापरता येईल का, असा उद्विग्न सवाल पालकमंत्र्यांनी केला. मंत्री आणि सर्वसामान्यांचा प्रवास सुरळीत होईल का, असे विचारत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
कंत्राटदारच जबाबदार!
महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे होणारे मृत्यू राज्याला शोभणारे नाहीत. कंत्राटदाराला जबाबदार धरा, तसेच वाहतूक अधिसूचना काढण्यासारखे लहरी निर्णय घेणे योग्य नसल्याचा टोला लगावला. अधिसूचना काढताना पालघर आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वाहतूक पोलिस आणि पोलिस अधीक्षकांच्या सल्ल्याने निर्णय घेतला पाहिजे, असे सांगितले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये
वाहतूक कोंडीमुळे लोकांच्या मनात नाराजी आहे. नागरिकांच्या संतापामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. जमाव चिडला, तर वाहनांना आगी लावतील. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्यास नाईक यांनी सांगितले.
आमदारांची तक्रार
महामार्गालगत राडारोडा टाकला जात आहे. तसेच महामार्गालगतच्या हॉटेलच्या पार्किंगची उंची वाढून महामार्ग खाली गेल्याची तक्रार आमदार राजेंद्र गावित यांनी केली. राडारोडा रोखण्यासाठी तपासणी नाका निर्माण करून सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. गावित यांनी खड्ड्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना महामार्गावरील खड्डे बुजवण्यासह मायक्रो सरफेस करण्याच्या कामाला लवकर सुरुवात केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.