धावत्या लोकलमध्ये प्रसूती; रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय सुविधांचा बोजवारा
रेल्वेस्थानकांवर वैद्यकीय सुविधांचा बोजवारा
धावत्या लोकलमधील प्रसूतीने प्रशासनाची बेफिकीरी उघड
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत मंगळवारी मध्यरात्री धावत्या लोकलमध्ये घडलेला प्रसंग मानवी संवेदनाच नव्हे, तर रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण ठरला. लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर प्रवासी विकास बेद्रे या तरुणाने आपत्कालीन साखळी ओढत लोकल थांबवली. राम मंदिर स्थानकात लोकल थांबल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे विकासने परिस्थिती हाताळत डॉ. देविका देशमुख यांच्या व्हिडिओ कॉलवरील मार्गदर्शनाखाली महिलेची यशस्वी प्रसूती केली आणि बाळ आणि बाळंतिणीचे जीव वाचवले. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, पण त्याच वेळी रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेची पोलखोल उघड झाली.
मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये प्रत्येक रेल्वेस्थानकावर २४ तास आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले होते; मात्र दशकभरानंतरही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. समीर झवेरी यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील १०० स्थानकांपैकी केवळ चार, तर पश्चिम रेल्वेच्या २९ स्थानकांपैकी केवळ १४ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध आहेत. याशिवाय मध्य रेल्वेच्या सुमारे १०० स्थानकांपैकी केवळ १५ स्थानकांवर रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.
---
प्रवाशांची गैरसोय
वांद्रे, अंधेरी, बोरिवली, विरारसारख्या गर्दीच्या स्थानकांवर वैद्यकीय सुविधेअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आहेत; मात्र वर्षानुवर्षे ते कुलूपबंद आहेत, त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत. परिणामी, प्रवाशांना वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही. ही बाब रेल्वे प्रवाशांसाठी लाजीरवाणी असल्याची प्रतिक्रिया रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता आणि उपनगरीय प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी व्यक्त केली.
----------
कोणाचा तरी जीव वाचवल्याचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. रेल्वे कर्मचारी मदतीसाठी पुढे आले; पण वैद्यकीय सुविधेचा अभाव जाणवला. आनंदाची गोष्ट म्हणजे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.
- विकास बेद्रे, प्रसूती करणारा युवक
----------
विकासच्या धैर्याचे कौतुक आहे. मी सांगितलेली प्रत्येक कृती त्याने योग्यरित्या केल्याने आई आणि बाळ सुरक्षित राहिले; परंतु या घटनेमुळे रेल्वेस्थानक, बसस्थानकावरील वैद्यकीय सुविधेचा अभाव उघडकीस आला.
- डॉ. देविका देशमुख, एमडी आयुर्वेद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.