आम्ही जनतेच्याच बाजूने, बिल्डरचा `विचार'' करणारे कोण ?
आम्ही जनतेच्याच बाजूने, बिल्डरचा ‘विचार’ करणारे कोण?
- नरेश म्हस्के यांचा विरोधकांना टोला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : अवघ्या एक वर्षाच्या कारकिर्दीत हिरानंदानी इस्टेटमधील रहिवाशांचा प्रश्न मार्गी लागला आहे. माजी लोकप्रतिनिधी फक्त ते बिल्डरांचाच ‘विचार’ करीत होते. त्यामुळे इतकी वर्षे हा विषय प्रलंबित होता. आम्ही बिल्डरधार्जिणे नसून रहिवाशांना बाजूने ठाम उभे राहणारे असल्याचे सांगत खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना टोला लगावला.
विशेष नगर वसाहत (इंटिग्रेटेड टाऊन प्लॅनिंग) योजनेअंतर्गत हिरानंदानी इस्टेट येथील मैदाने आणि सुविधा भूखंड ठाणे महापालिकेने ताब्यात घ्यावेत, बिल्डरने ती देण्यास टाळाटाळ केल्यास त्याची सीसी थांबविण्याचे आदेश आज नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना दिले. विशेष नगर वसाहत (इंटिग्रेटेड टाऊन प्लॅनिंग) योजनेअंतर्गत हिरानंदानी इस्टेट येथे विकसकाने गेल्या १० वर्षांत ११८ इमारती विकसित केल्या आहेत. १० वर्षांचा काळ उलटून गेला तरी विकसकाने सुविधा भूखंड आणि रहिवाशांची हक्काची मैदाने विकसित न करता आपल्या ताब्यात ठेवली आहेत. यासंदर्भात हिरानंदानी इस्टेटमधील गृहसंकुलाच्या हिरानंदानी इस्टेट फेडरेशनने खासदार नरेश म्हस्के यांना हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार खासदार नरेश म्हस्के हे ठाणे महापालिका आणि शासनस्तरावर पाठपुरावा करीत होते. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी या प्रश्नावर आज व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव असीम गुप्ता नगरविकास विभागातून, खासदार नरेश म्हस्के दिल्लीतून तर ठाणे महापालिका प्रशासकीय भवनातून पालिका आयुक्त सौरभ राव आणि हिरानंदानी इस्टेट फेडरेशनचे चेअरमन डॉ. आय. बी. डे, सदस्य अमित उपाध्याय, शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण नागरे सहभागी झाले होते.
आज अस्तित्वात असलेल्याच सुविधा विकसक रहिवाशांना देत आहे. नियमाप्रमाणे नवीन खेळाची मैदाने आणि सुविधा भूखंड सार्वजनिक करणे, ठाणे महापालिकेला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र ती अद्याप विकसकाच्या ताब्यात असून, प्रकल्प पूर्ण व्हायला अद्याप बरीच वर्षे लागणार असल्याने रहिवाशांवर अन्याय होत असल्याची भावना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत बोलून दाखविली. जुन्या व नव्याने राहायला आलेल्या रहिवाशांना नवीन क्लब हाऊस, रिक्रेएशन सेंटर, मैदाने, इतर सुविधा तातडीने देण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली. त्यानंतर अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी चर्चेनंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सुविधा भूखंड आणि मैदाने तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. विकसकाने चालढकल केल्यास त्याच्या सीसी थांबविण्याचेही आदेश गुप्ता यांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.