थोडक्यात बातम्या रायगड
ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रसाद भोईर
पेण (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात संघटन अधिक मजबूत करण्याच्या हेतूने प्रसाद भोईर यांची मध्य व उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटात नवचैतन्य निर्माण झाले असून, युवक नेतृत्वाला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. प्रसाद भोईर हे उच्चशिक्षित असून, त्यांना प्रशासकीय आणि कायदेशीर क्षेत्रातील सखोल ज्ञान आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये उत्साहाने काम करत युवकांना संघटनेशी जोडले. त्यांचा उत्साह आणि संघटनकौशल्य पाहता, पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, उरण आणि अलिबाग या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या मध्य व उत्तर रायगड जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी सोपवली आहे. भोईर यांच्या या निवडीचे स्वागत संपूर्ण रायगड जिल्ह्यात होत आहे. ज्येष्ठ शिवसैनिक, युवा पदाधिकारी आणि महिला शाखेच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षसंघटना नव्या उर्जेने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
.................
देवानंद गोगर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
मुरूड (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या ताडवाडी शाळेतील शिक्षक देवानंद गोगर यांना महाराष्ट्र शासनाचा “जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. अलिबाग येथे झालेल्या समारंभात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. गोगर यांनी १९९५ रोजी राजिप शाळा खामदे येथे सेवा सुरू केली. तीन दशकांच्या काळात त्यांनी आदिवासी आणि स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले. शिष्यवृत्ती सराववर्ग, गृहभेटी आणि गुणवत्तावृद्धी मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला. ताडवाडी शाळेच्या भौतिक विकासासाठी लोकसहभागातून लाखो रुपयांचा निधी उभारला. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत त्यांनी शिक्षक समाजात आदर्श निर्माण केला आहे. मुरूड तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात त्यांनी पुढाकार घेतला, तर अलिबाग शिक्षक पतपेढीत मानद सचिव म्हणूनही प्रभावी कार्य केले. त्यांच्या अष्टपैलू कार्याचा गौरव म्हणून रायगड जिल्हा परिषदेने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
.................
शेतकऱ्यांना भरपाई देण्याची विकास प्रतिष्ठानची मागणी
रोहा (वार्ताहर) : गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानतर्फे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि तहसीलदार किशोर देशमुख यांना तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे निवेदन देण्यात आले. बुधवारी आणि गुरुवारी रात्रीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी उभे पीक जमीनदोस्त झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. काही शेतकऱ्यांना चुकीच्या ऑनलाइन नकाशांमुळे पीक पाहणीस अडचणी येत आहेत. तसेच आंबा पिकाच्या विम्यातूनही अपेक्षित लाभ मिळत नाही, अशी तक्रार करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संस्थेने खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यावर लक्ष देऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. निवेदन सादर करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, उपाध्यक्ष अनंत मगर, संचालक विनोद पाटील, संतोष दिवकर, रघुनाथ कडू आदी उपस्थित होते.
.................
बाहे येथे शिलाई मशिन व्यवसायाचे प्रशिक्षण कार्यक्रम
रोहा (बातमीदार) ः तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावात शिलाई मशिन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच यशस्वी पार पडला. रेस्टी स्टार स्वयंरोजगार संस्था, अलिबाग व बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे रोशन पाटील व अनिता मोरे यांनी प्रशिक्षण शिबिरात महिलांना सर्वोत्तम मार्गदर्शन केले. सलग चौदा दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात बाहे गावातील विविध बचत गटातील एकूण ४० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या शिबिरात कापडापासून उशी कव्हर, पेन पाऊच, हात पिशवी, हात रूमाल आदीसह अन्य कापडकाम शिकवण्यात आले.
...............
अंगणवाडी सेविकांसह सुपरवायझर यांना टॅब वितरण
रोहा (बातमीदार) ः गत वर्षापासून रोहा तालुक्यामध्ये अंगणवाडीमध्ये क्वेस्ट व महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यात पालवी प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत रोहा तालुक्यातील २१ मॉडेल अंगणवाडी सेविका व सीडीपीडी तसेच सुपरवायझर यांना एमजीएल विद्या पालवी प्रकल्पामार्फत टॅब वितरण करण्यात आला. अंगणवाडीपासून दिले जाणारे शिक्षण अधिक दर्जेदार असावे व बाल वयापासूनच बालकांच्या बुद्धीमत्तेला चालना मिळावी, तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने क्वेस्ट व महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यात पालवी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अंगणवाडी शिक्षणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे चौथ्या स्तराचे प्रशिक्षण व टॅब वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या टॅबचा उपयोग मॉडेल अंगणवाडी सेविका त्यांच्या बीट मध्ये प्रशिक्षण देताना पालकांच्या व्हिडिओवर व इतर सेविकांना कामात मदत करण्यासाठी होणार आहे. या टॅबमुळे सेविकांमध्ये खूप आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. टॅब वितरणासाठी कार्यक्रम प्रसंगी तालुक्याच्या महिला व बालविकास अधिकारी शरयू शिंदे, पर्यवेक्षिका सुप्रिया भगत, भरती भाकरे, कल्पना नांदेकर, करिष्मा खाडे तसेच पालवी रोहा प्रकल्पाचे व्यवस्थापक नितीन मराडे, प्रकल्प प्रमुख भूषण पटारे हे उपस्थित होते. सोबतच पालवी प्रकल्पातील सर्व प्रकल्प समन्वयक व मॉडेल अंगणवाडी सेविका देखील उपस्थित होत्या.
...........
ज्येष्ठ नागरिक संघाच्या हृदयरोग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण (बातमीदार) : पेण तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने माधवबाग येथे आयोजित हृदयरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे आयोजन संघाचे अध्यक्ष रामदास पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या शिबिराचे आयोजन सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि स्थानिक पोलिस विभागाच्या सहकार्याने करण्यात आले. या शिबिरात प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा सातपुते यांनी उपस्थित नागरिकांची तपासणी केली. त्यांनी प्रत्येक रुग्णाची ईसीजी, बीपी, नाडी तपासणी करून जीवनशैलीतील बदल, आहारातील संतुलन आणि तणावमुक्त जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन दिले. डॉ. सातपुते यांनी सांगितले की, हृदयरोगाचा धोका वाढत्या वयासोबत वाढतो. मात्र नियमित व्यायाम, योग्य आहार आणि वेळेवर तपासणी केली, तर या आजारावर नियंत्रण ठेवता येते. शिबिरात एकूण ४७ नागरिकांनी तपासणी करून घेतली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी सांगितले की, ज्येष्ठांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. पुढेही अशा वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाईल.
...............
दीव येथे गावदेवी आणि जरू मरू देवी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा
पेण (बातमीदार) : दीव गावात गावदेवी आणि जरू मरू देवी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. या मूर्तींचे दान ज्ञानदेव बाळाराम म्हात्रे यांनी केले असून, त्यांच्या पुढाकाराने हा धार्मिक सोहळा थाटात साजरा झाला. मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याची सुरुवात शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी झाली. ज्ञानदेव यांच्या घरी ठेवलेल्या दोन्ही देवींच्या मूर्ती दुपारी दोन वाजता टाळ, मृदंग, भजनाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह मिरवणुकीतून गावात आणण्यात आल्या. संध्याकाळी पाच वाजता मिरवणूक संपल्यानंतर देवींची प्रतिष्ठा गावदेवी मंदिरात करण्यात आली. रविवार, १२ ऑक्टोबर रोजी अभिषेक, होम-हवन आणि पूजा विधी पार पडले. या धार्मिक विधीत पाच पुरोहितांनी मंत्रोच्चारासह आहुती दिल्या. पाच जोडप्यांनी तेल, समिधा, कडधान्य, नारळ आदींच्या आहुती देऊन सहभाग नोंदवला. पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ, महिला मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमात श्री नागेश्वर भाऊ बंद मंडळ आणि नागेश्वर ट्रस्ट मंडळ, देवयानी यांनी मोलाचे सहकार्य केले. दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
....................
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना बांबू रोपांचे वाटप
श्रीवर्धन (वार्ताहर) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वडवली ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे बांबू रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करून हरित उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी माधव जाधव यांच्या हस्ते वडवली जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला बांबूचे एक रोप देण्यात आले. गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ग्रामविकासासोबतच पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे होते. गटविकास अधिकारी जाधव यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे व त्यांची निगा राखण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, वृक्ष लागवड ही केवळ पर्यावरण रक्षणाची गोष्ट नसून, ती शेती आणि मानवी जीवनाच्या समृद्धीशी निगडित आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना झाडांना कुंपण करणे, नियमित पाणी घालणे आणि आपल्या झाडावर स्वतःचे नाव असलेली पाटी लावण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमानंतर जाधव यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत शिक्षकवर्गाला प्रोत्साहन दिले व विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी किशोर नागे, ग्रामपंचायत अधिकारी गोविंदा वासले, मुख्याध्यापिका पुजा मूरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर बिराडी, तसेच आगरी समाज अध्यक्ष श्याम धुमाळ उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश पसरला.
.................
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित प्रशांत वाणी
श्रीवर्धन (वार्ताहर) : शेखाडी मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सुरेश वाणी यांना २०२४–२५ वर्षाचा रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. अलिबाग येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते वाणी यांचा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेने २०२२–२३ पासून राहिलेल्या शिक्षक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन या वर्षी केले होते. प्रशांत वाणी यांनी शेखाडी मराठी शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि ग्रामीण गुणवत्ता पुरस्कार मिळवून दिला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाणी यांच्या सन्मानानंतर पंचायत समिती श्रीवर्धन, शिक्षकवृंद, माळी समाज श्रीवर्धन, शेखाडी ग्रामस्थ मंडळ आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या कामगिरीने तालुक्यातील शिक्षकांना प्रेरणा मिळाली आहे.
........................................
रघुनाथ वर्तक यांचे निधन
पेण (बातमीदार) : पेण तालुक्यातील मोठे आढाव गावचे ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ नामदेव वर्तक यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पोलादपूर, पेण आणि माणगाव येथे नोकरी केली होती. आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि नम्र स्वभावाने त्यांनी सर्वत्र आदराचे स्थान निर्माण केले. रघुनाथ वर्तक हे गावातील सुखदुःखात सदैव सहभागी राहत असत. कीर्तन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी घेत. संत तुकाराम महाराज मंडळ आणि ह.भ.प. रसाळ महाराज संस्था यांचे ते ज्येष्ठ सदस्य होते. तसेच सागर विद्यालय वाशी येथे सचिव म्हणून त्यांनी कार्य केले आणि आगरी विकास मंचाचे संचालक म्हणून समाजकार्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. वर्तक यांच्या निधनाने मोठे आढाव गावातील एक प्रेमळ, समाजशील आणि आदर्श व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
.........
गुन्हेगारी मुक्त गाव विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन
जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांची उपस्थिती
अलिबाग (वार्ताहर) ः महाराष्ट्र पोलिस व स्वदेस फाउंडेशन ग्रामीण सक्षमीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गुन्हेगारी मुक्त गाव, आपली जबाबदारी, आपला अभिमान या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र गुरुवारी ता.१६ पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रामीण समाजातील नागरिकांना सजग, जबाबदार आणि गुन्हेगारीविरोधी भूमिकेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विशेषतः कातकरी, आदिवासी व इतर वंचित समाजातील मुलींच्या लहान वयात होणाऱ्या गरोदरपणासारख्या संवेदनशील विषयांवर सखोल प्रबोधन केले. महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, ग्रामीण भागांमध्ये अवैध दारू विक्री, मटका, जुगार व इतर गुन्हेगारी प्रवृत्ती यांविरोधात पोलिस प्रशासनाने उचललेल्या ठोस पावले आणि उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. नागरिकांनी अशा प्रकारांबाबत कोणतीही गोपनीय माहिती दिल्यास ती विशेष व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी, मात्र खोटे गुन्हे दाखल करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे स्वदेस ज्ञानमित्र सायली कार्लेकर यांनी आंचल दलाल यांच्यासोबत घेतलेली संवादात्मक चर्चा. या चर्चेत अनेक समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी थेट प्रश्न विचारले व त्यांना योग्य दिशा देणारी समाधानकारक उत्तरे मिळाली. या मुक्त संवादामुळे सत्र अधिक प्रभावी व परिणामकारक ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी आंचल दलाल तसेच स्वदेस फाउंडेशन यांचे उपस्थितांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या सत्राने “गुन्हेगारी मुक्त गाव” या संकल्पनेला ग्रामीण पातळीवर अधिक बळकटी दिली. या कार्यक्रमाच्या वेळी स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे आणि वरिष्ठ समन्वयक स्वप्निल स्वामी तसेच सर्व पोलिस स्थानक प्रभारी उपस्थित होते.
....................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.