दिवाळी गझल पहाट

दिवाळी गझल पहाट

Published on

पेटल्या माणुसकीच्या पणत्या अन्‌ कारुण्याच्या ज्योती!

गज़लनवाज भीमराव पांचाळेंच्या स्वरसाजाने ‘सकाळ’ची ‘दिवाळी गज़ल पहाट’उजळली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : दीपावलीच्या पर्वावर ‘माणुसकीच्या पणत्या आणि कारुण्याच्या ज्योती’ प्रज्वलित करून गज़लनवाज भीमराव पांचाळे यांनी आज रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. देशभरात विखुरलेल्या गझलकारांच्या भावस्पर्शी रचनांना स्वरसाज चढवून त्यांनी ‘सकाळ’ने पहिल्यांदाच आयोजित केलेली ‘दिवाळी गज़ल पहाट’ यादगार केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात भावस्पर्शी शब्द, स्वर आणि सुरांची ऊब पसरवणाऱ्या गझलची नजाकत भीमराव पांचाळे आणि त्यांच्या कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची सुरेल मैफल क्षणाक्षणाला रंगत गेली. ‘सकाळ’ आयोजित ही ‘दिवाळी गझल पहाट’ म्हणजे केवळ मैफल नव्हे, तर संगीत, शब्द आणि संवेदनांचा उत्सव झाली. सादर झालेल्या गझलांनी दिवाळीचा उजेड अधिकच भावमय केला.
या मैफलीला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळ व ‘एलआयसी’ हे प्रमुख प्रायोजक, तर रिसर्च आयु, लिज्जत आणि पॅराडाईज ग्रुप हे सहप्रायोजक होते. ‘ब्राईट’ हे आउटडोअर पार्टनर होते. या वेळी चित्रलेखा खातू-रावराणे, डॉ. श्रद्धा निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
गज़लनवाज पांचाळे यांनी एकापेक्षा एक सरस गझल सादर केल्या. ‘वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे...’, ‘हे का कुणी फुलांना सांगायला हवे...’, ‘जळणाऱ्यांना विस्तव कळतो...’ अशा गझलांनी सभागृहात भावनांचा जल्लोष उभा केला. त्यांच्या गायकीतील भावनिक खोली आणि मराठी शब्दांची अचूक नजाकत रसिकांच्या मनात दीर्घकाळ रुंजी घालत राहिली. त्यातही ऊर्दू आणि मराठीचा मिलाफ असलेली ‘ऐ सनम, आँखो को मेरी खूबसूरत साज दे, येऊन स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे’ या गज़लनवाजांच्या प्रतिभेला टाळ्यांच्या कडकडाटात उत्तुंग दाद दिली.
भीमराव पांचाळे यांच्यासोबत त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी गझलगायकीचा समृद्ध वारसा पुढे नेत आपल्या मधुर आणि आश्वासक आवाजाने रसिकांची मने जिंकली. ‘तू फुलांचा घोस माझा, तू सुंगधी श्‍वास माझा’, ‘करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा’, ‘चांदण्यांसाठी असे...’, ‘रोशनीचे कायदे...’ अशा एकाहून एक तरल आशयाच्या गझल सादर करून या मैफलीची रंगत वाढवली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भीमराव पांचाळे यांनी ए. के. शेख यांच्या प्रसिद्ध गझलेचा ‘गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय!’ हा भावपूर्ण आविष्कार सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. टाळ्यांचा गजर, प्रशंसेची दाद आणि दिवाळीच्या पहाटेचा आनंद ‘सकाळ’च्या रसिक वाचकांसाठी अविस्मरणीय ठेवा ठरला.
स्वरांसोबतच वाद्यवृंदाची लाजवाब साथही मैफलीला श्रीमंत करणारी ठरली. त्यात गिरीश पाठक (तबला), ओंकार सोनवणे (संवादिनी), अब्रार अहमद (संतूर), इकबाल वारसी (व्हायोलिन) आणि प्रशांत अग्निहोत्री (बासरी) यांनी त्यांच्या वादनावर उत्स्फूर्त टाळ्यांची कमाई केली. किशोर बळी यांच्या अभ्यासपूर्ण आणि खुसखुशीत निवेदनाने कधी अंतर्मुख केले तर कधी प्रेक्षकांना मनसोक्त हसवत ही मैफल खऱ्या अर्थाने प्रकाशमान केली.
-----------
कोट...
मराठीमध्ये मी गजल पहिल्यांदाच अनुभवतेय. या मैफलीने मनाला तृप्ती मिळाली. चांगली मैफल रंगली. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. सुंदर अशा गझलने दिवाळीची सुरुवात झाली. रसिक श्रोतेही पहाटे गझलचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी खरंच खूप एन्जॉय करतेय. ‘सकाळ’चे त्याबद्दल खूप आभार.
- डॉ. श्रद्धा निकम, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, रिसर्च आयु

--
गझलनवाज भीमराव पांचाळे यांना ६१व्या राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘लता मंगेशकर पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. त्यामुळे त्यांची गझल ऐकण्याची इच्छा होती. ‘सकाळ’ने ती संधी उपलब्ध करून दिली. दिवाळीची सुरुवात श्रवणीय गझलने झाली. इथे आल्यावर आवडीची गझल ऐकायला मिळाली. मन प्रसन्न झाले.
- चित्रलेखा खातू-रावराणे, वित्तीय सल्लागार, मुख्य लेखा-वित्त अधिकारी, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई
--

गज़लनवाज भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या गझलने आज आपल्याला मंत्रमुग्ध केले. ‘सकाळ’ने सुंदर अशी ‘दिवाळी गज़ल पहाट’ आयोजित केली, त्याबद्दल ‘सकाळ’च्या सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
- ॲड. आशीष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com