आधारवाडी कारागृहात ''दिवाळी पहाट

आधारवाडी कारागृहात ''दिवाळी पहाट

Published on

आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : कल्याण येथील आधारवाडी कारागृहात शनिवारी (ता. १८) ‘दिवाळी पहाट’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाण्यातील ‘सूर ताल ग्रुप’ने याप्रसंगी भावगीत, भक्तिगीत, देशभक्तीपर गीते तसेच मराठी आणि हिंदी गीतांचे सादरीकरण करून उपस्थित बंदिवानांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाला उल्हासनगरचे सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीही दोन गाणी सादर करून कैद्यांच्या उत्साहात भर घातली.

अपर पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक व कारागृह उपमहानिरीक्षक (दक्षिण विभाग, मुंबई) योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक प्रदीप जगताप यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. हा कार्यक्रम कारागृह विभाग, सेवाधाम सामाजिक संस्था, ठाणे आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या वेळी सेवाधाम, प्रयास संस्था, प्रिझम मिशनरी, फन क्लब, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड, सहेली संस्था आणि बालकल्याण समिती, ठाणे या संस्थांचे प्रतिनिधी तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत चौधरी यांनी केले.

महिला कैद्यांच्या वस्तूंची विक्री
दीपावली सणाचे औचित्य साधून महिला बंदिवानांनी रांगोळ्या, आकाशकंदील, कानातील व गळ्यातील दागिने अशा विविध वस्तू तयार केल्या. या वस्तूंपैकी सुमारे चार हजार रुपये किमतीच्या वस्तू विकल्या गेल्या असून, ही संपूर्ण रक्कम महिला बंदिवानांना देण्यात येणार आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर
कारागृहात सध्या नर्सिंग कोर्स, संगणक प्रशिक्षण तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू आहे. महिला बालकल्याण समितीच्या राणी बैसाने यांनी ‘सहेली’ संस्थेच्या मदतीने शिवणकामासाठी शिलाई मशीन उपलब्ध करून दिली आहे. तसेच, ‘प्रिझन मिनिस्ट्री, मुंबई’ ही संस्था महिला बंदिवानांना फॅशन डिझाइनचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती अधीक्षक जगताप यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com