गिधाडांचे घरटे शोधा, दोन हजार मिळवा!
बदलापूर, ता. २० (बातमीदार) : वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी यंदाही वन्यजीव सप्ताह राज्यभर साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात एक आगळावेगळा आणि उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘गिधाड घरटे शोधमोहीम स्पर्धा’ या मोहिमेंतर्गत नागरिकांना ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत सध्या वापरात असलेले गिधाडाचे घरटे शोधून दाखवायचे आहे. असे घरटे ओळखून स्थानिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दोन हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा उपक्रम वनविभाग, महाराष्ट्र राज्य, इंटक ठाणे चॅप्टर आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या संपूर्ण मोहिमेला सीस्केप, महाड यांचे सहकार्य लाभले आहे. गेल्या दोन दशकांत गिधाडांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचा आणि काळजीचा विषय ठरली आहे. विषारी औषधांचा वापर, निवासस्थानांची कमतरता आणि पर्यावरणीय असमतोल या कारणांमुळे गिधाडे जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचली आहेत. अशा परिस्थितीत गिधाडांचे अस्तित्व ओळखणे, त्यांची घरटी शोधणे आणि त्यांचे रक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी परिसरात दिसणारे गिधाडांचे घरटे शोधून त्याची माहिती संबंधित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना द्यावी. फक्त ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असलेले आणि सध्या गिधाड वापरत असलेले घरटेच बक्षिसासाठी पात्र ठरणार आहेत.
संख्या घटतेय
ठाणे जिल्हा हा पूर्वी गिधाडांच्या हक्काच्या वास्तव्याचा भाग होता. कालांतराने नागरीकरण, जंगलात खाद्याचा तुटवडा या कारणांमुळे त्यांची संख्या हळूहळू घटत गेली. यापूर्वी २०२२ वर्षांत माहुली किल्ल्याच्या परिसरात गिधाडांचे शेवटचे वास्तव्य नोंदवले होते. आता तीन वर्षांत गिधाडांचे घरटे आढळून आलेले नाही, अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे. आकाशात अनेकदा ही गिधाडे दिसतात; मात्र ती ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास नाहीत. नाशिक जिल्ह्यात यांची संख्या मोठी आहे. एक गिधाड साधारणत: दिवसभरात १०० किलोमीटर परिसरात प्रवास करत असते. त्यामुळे ते ठाणे जिल्ह्यात येतात, असेही हरड सांगतात.
गिधाड उपहारगृह व्हावे
मेलेली जनावरे दूर जंगलात नेऊन टाकली जातात. त्याकडे गिधाडे आकर्षित होतात. त्यानंतर त्यांची संख्या वाढते. असे सध्या ठाणे जिल्ह्यात होत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी लढा वल्चर रेस्टॉरंट अर्थात गिधाड उपहारगृह तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे, असे मत अविनाश हरड यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.