सारणी-निकावली मुख्य रस्ता खचला
कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील सारणी-निकावली हा मुख्य रस्ता सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. काही ठिकाणी तो पूर्णपणे खचला आहे, तर काही ठिकाणी दबला आहे. परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी या रस्त्याच्या दुरुस्ती, रुंदीकरण, पूल बांधणी आणि मजबुतीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. तेव्हा हे काम चांगले झाल्याचे सांगून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते, मात्र यंदाच्या पहिल्याच पावसात या कामाचा दर्जा उघड झाला. निकावली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ रस्ता पूर्णपणे खचला असून, त्याच परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याचा सपाटपणा हरवला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे आणि अपघाताची शक्यता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी बोअरवेल यंत्रणा असलेली गाडी या रस्त्यावरील खड्ड्यात अडकून पडल्याची घटना घडली. मोठ्या अवजड वाहनांसाठी हा मार्ग आता धोकादायक बनला आहे.
स्थानिक नागरिकांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित ठेकेदार आणि विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोठ्या खर्चानंतर अवघ्या काही महिन्यांत रस्ता पुन्हा खराब होणे म्हणजे सार्वजनिक निधीची उधळपट्टी असल्याचा नागरिकांनी म्हटले आहे. याबाबतीत संबंधित प्रशासन विभागाशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
सारणी-निकावली ते म्हसाड-उर्से हा रस्ता कोट्यवधीचा खर्च करून तयार केला, मात्र आता निकावलीजवळ, तसेच इतर ठिकाणी रस्ता खचला असून, काही ठिकाणी दबला आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची नव्याने दुरुस्ती करावी.
- गणेश ठाकरे, उपसरपंच,
सारणी ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.