१९७१ च्या रणसंग्रामातील नायक हरपला 
वीर चक्र विजेते, कमांडर अशोक कुमार यांचे निधन

१९७१ च्या रणसंग्रामातील नायक हरपला वीर चक्र विजेते, कमांडर अशोक कुमार यांचे निधन

Published on

१९७१च्या रणसंग्रामातील नायक हरपला
वीरचक्र विजेते कमांडर अशोक कुमार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य दाखवणारे आणि ‘ऑपरेशन फोर्स अल्फा’ या विशेष नौदल मोहिमेचा भाग असलेले वीरचक्र विजेते कमांडर अशोक कुमार (सेवानिवृत्त) यांचे शनिवारी (ता. १८) सकाळी मुंबईत निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. ते काही काळ आजारी होते. त्यांच्या निधनाने भारतीय नौदलाने तेजस्वी योद्धा गमावला आहे. अशोक कुमार यांनी युद्धकाळात ऑपरेशन फोर्स अल्फामध्ये आयएनएस पनवेल या जहाजावर सब-लेफ्टनंट म्हणून सेवा दिली होती. या छोट्या पण निर्णायक मोहिमेत त्यांनी दाखवलेले धैर्य, नेतृत्व आणि संयम आजही नौदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
पूर्व पाकिस्तानच्या मुक्तीसाठीच्या युद्धात ‘फोर्स अल्फा’ हे छोटे  पण अत्यंत धाडसी दल होते. या दलात चार जहाजांचा समावेश होता. आयएनएस पनवेल, पद्मा, पालश आणि बीएसएफचे चित्रांगदा हे जलवाहन. कमांडर एम. एन. आर. सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे दल सुंदर्बन डेल्टामधून शत्रूच्या हद्दीत घुसले आणि चालना-मोंगला या बंदरांवर समुद्रमार्गे हल्ला केला. या मोहिमेत आयएनएस पनवेलवरील सब-लेफ्टनंट अशोक कुमार यांनी नेतृत्व केले. खुलना नदीकिनारी झालेल्या भीषण लढाईत त्यांनी दाखवलेले धैर्य अपूर्व होते. शत्रूच्या तोफांच्या माऱ्यातही त्यांनी जहाजाचे इंजिन चालू ठेवत सहकाऱ्यांचे जीव वाचवले. प्रतिहल्ल्यात पनवेलने शत्रूची अनेक ठाणी आणि किल्ले उद्ध्वस्त केले.
या मोहिमेत ‘फोर्स अल्फा’ दलातील ११ जवानांनी बलिदान दिले. त्यांच्या पराक्रमामुळे भारतीय नौदलाला मोठा विजय मिळाला. कमांडर एम. एन. आर. सामंत आणि ले. कमांडर नरोन्हा यांना महावीर चक्र, तर सब-लेफ्टनंट अशोक कुमार यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले.  हा सन्मान नौदलाच्या इतिहासात अपूर्व मानला जातो.
...
शांत आणि साधे आयुष्य
अशोक कुमार निवृत्तीनंतर मुंबईत वास्तव्यास होते. अतिशय साधे, शांत आणि विनम्र स्वभावाचे ते अधिकारी होते. आयुष्यभर त्यांनी  आपल्या पराक्रमाचा कधीही गवगवा केला नाही. देशसेवेचा अभिमान मनात ठेवत त्यांनी निवृत्तीनंतरचे आयुष्य संयमाने आणि साधेपणाने व्यतीत केले. त्यांच्या निधनानंतर नौदल अधिकारी, माजी सैनिक आणि इतिहास अभ्यासकांनी शोक व्यक्त केला आहे. ‘कमांडर अशोक कुमार हे शौर्य, संयम आणि कर्तव्यभावनेचे प्रतीक होते,’ असे एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने सांगितले.
...
कमांडर अशोक कुमार हे १९७१च्या भारत-पाक युद्धातील खरे रणवीर होते. त्यांनी आपल्या शौर्याचा कधीही गाजावाजा केला नाही; पण त्यांच्या कार्याने भारतीय नौदलाच्या इतिहासात कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे. अशा निःशब्द नायकांना देश सदैव अभिमानाने स्मरणात ठेवेल. माझी शासनाकडे एक नम्र विनंती आहे की, तेजस्वी वारशाचा गौरव म्हणून पनवेल गावात किंवा नवी मुंबई विमानतळ परिसरात ‘आयएनएस पनवेल’ची प्रतिकृती उभारावी. यामुळे भावी पिढीला त्या काळातील नौदलाच्या शौर्याची आणि सेवाभावाची जाणीव होईल.
- कमांडर डॉ. श्रीकांत केसनूर, व्हीएसएम (सेवानिवृत्त), लेखक आणि नौदल इतिहासकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com