विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे समुपदेशन

विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे समुपदेशन

Published on

विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे समुपदेशन
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : घणसोली परिसरात राहणाऱ्या दहावीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने परिसरात संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून रबाळे पोलिसांनी सकारात्मक पावले उचलत शिक्षक व शाळा प्रशासनासाठी विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आणि मानसिक आरोग्य संवर्धन मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले. या कार्यक्रमात ऐरोली व घणसोलीतील सुमारे ३५ शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते.
शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी ऐरोली सेक्टर-८ येथील म्हात्रे सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, शैक्षणिक ताण, कौटुंबिक समस्या, सोशल मीडियाचा दडपणात्मक प्रभाव आणि एकटेपणा आदी कारणांमुळे मुलांमध्ये नैराश्य वाढताना दिसत आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सर्वात जवळचा मार्गदर्शक असतो. म्हणूनच त्यांच्या मनातील भावनिक ताण ओळखून वेळेवर त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच सर्व शाळा प्रशासनाने शाळेतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, अशा सूचना केल्या, तर महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा काळे यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यविषयक संवेदनशीलतेवर भर देतानाच, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण टाकण्याऐवजी त्यांना समजून घेणारी मैत्रीपूर्ण शिक्षक भूमिका आजच्या काळात अधिक महत्त्वाची आहे. तू कमी पडतोस असे म्हणण्याऐवजी तू करू शकतोस, ही प्रेरणा देण्याची गरज आहे. इंटरनेट, इन्स्टा‍ग्राम व व्हॉट्सॲपचा वापर वाढला असून, बहुतांश विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे पालकांनीदेखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे वर्षा काळे यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com