थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

सारसोळे येथील पाणी समस्या सोडविण्याची मागणी
नेरूळ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर-६, सारसोळे गावात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचे तातडीने निवारण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नेरूळ सेक्टर-६ सारसोळे गाव या परिसरात पाणी कमी दाबाने येत आहे. सध्या दिवाळी सुरू असून, ऐन दिवाळीत रहिवाशांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणी कमी दाबाने येत असल्याने रहिवाशांना विशेषता महिलावर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. कमी पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश देऊन सारसोळेच्या ग्रामस्थांना व सेक्टर-६ च्या रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
...............
ठेकेदाराकडून वेतनाचे धनादेश मिळाल्याने आंदोलन स्थगित
तुर्भे (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेतील उद्यान विभागात कार्यरत कामगारांना किमान वेतन दिले जात नसल्याने समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून कामगारांनी उपोषण केले होते, मात्र १७ दिवसानंतर कामगारांच्या मूळ ठेकेदाराकडून वेतनाचे धनादेश दिल्यानंतर शुक्रवारी रात्री उपोषण स्‍थगित करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर ते दिघा विभाग कार्यालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्याने आहेत. या उद्यानात कार्यरत कामगारांना किमान वेतन आणि लेव्हीचे सर्व फायदे देणे बंधनकारक होते. यामधील ४० कामगारांना किमान वेतन दिले जात नव्हते. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता, परंतु याकडे दुर्लक्ष केले जात होते.
..................
खैरणे एमआयडीसीतील गारमेंटमधून आठ बालकामगारांची सुटका
नवी मुंबई (वार्ताहर) : ठाणे येथील महिला व बालकल्याण विभागाने बुधवारी दुपारी खैरणे एमआयडीसीतील एका गारमेंट युनिटवर छापा मारून आठ अल्पवयीन बालकामगारांची सुटका केली. तसेच या बालकामगारांना कमी वेतनात अति श्रमाचे काम देऊन त्यांना राबवून घेणाऱ्या तिघा गारमेंटचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांना गारमेंट चालक मागील काही महिन्यांपासून कमी वेतनात राबवून घेत असल्याचे आढळून आले आहे. खैरणे एमआयडीसीतील फ्लॉट नं ए/७४/९ येथे तळमजला व पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या गारमेंटमध्ये बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवण्यात आल्याची तसेच त्यांच्याकडून अतिश्रमाचे काम करून घेऊन त्यांना कमी वेतनात राबवून घेण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महिला व बालकल्याण विभाग, ठाणे कार्यालयातील सुपरवायझर अमोल वाघ (वय ३८) व त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी खैरणे एमआयडीसीतील या गारमेंट वर छापा मारला. या वेळी सदर गारमेंटमध्ये आठ बालकामगार काम करताना आढळून आले. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने या गारमेंटमधून १५ ते १७ वयोगटातील आठ अल्पवयीन मुलांची सुटका केली.
...............
नेरूळकर वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त
नेरूळ (बातमीदार) ः नेरूळ फेज दोन वसाहतीत महावितरणच्या वारंवार बत्तीगुलमुळे येथील नागरिक, व्यापारी संतप्त झाले आहेत. या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून वारंवार महावितरणची बत्ती गुल होत असल्याचा फटका येथील रहिवासी व व्यापाऱ्यांना बसत आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता सेक्टर-८ मध्ये खंडित झालेला वीजपुरवठा जवळपास दोन तासांनी सुरू झाला. या विभागात बत्ती गुल होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने सामान्य नागरिक, दुकानदार यांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोड शेडिंगच्या नावाखाली महावितरण सामान्य नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप स्थानिक वीजग्राहक आणि शिवसेना उपशहर प्रमुख गणपत शेलार यांनी केला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत असून, रुग्णालयालादेखील याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
............
लॅबगार्ड कंपनीत कामगारांचा पगारवाढीचा करार
उरण (वार्ताहर)ः पेण येथील लॅबगार्ड कंपनीतील कामगारांना संघटनेमार्फत १० हजार रुपये पगारवाढ, १२.५ टक्‍के बोनस, मेडिक्लेम आणि इतर सुविधा देण्याचा करार करण्यात आला. करारानुसार पगारवाढीची रक्कम दिवाळीच्या पूर्वसंध्येला कामगारांना देण्यात येणार आहे, ज्यामुळे कामगारांची दिवाळी आनंदाची झाली आहे. या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे अजय कणेकर, प्रोडक्शन मॅनेजर राहुल जोगत तसेच कामगार प्रतिनिधी हरेश पाटील, सुरेश दळवी, प्रमोद पाटील, रोहन कडव आदी उपस्थित होते. दीपावलीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पगारवाढीच्या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
..................
पनवेलमध्ये दिवाळीनिमित्त भव्य रांगोळी प्रदर्शन
पनवेल (बातमीदार) ः दिवाळीनिमित्त व्ही. के. ७५ सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रांगोळी प्रदर्शनाचे उद्‌घाटन शनिवारी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. सीकेपी हॉल, छत्रपती शिवाजी महाराज रोड, जूना आदर्श हॉटेल, पनवेल येथे रंग आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले रामशेठ ठाकूर, दशावतार, छत्रपती शिवाजी महाराज, वासुदेव बळवंत फडके, रतन टाटा, देवानंद यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या आणि सांस्कृतिक विषयांवरील देखण्या रांगोळ्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राजू गुप्ते उपस्थित होते. या वेळी व्ही. के. ७५ सामाजिक मंडळाचे सर्व सदस्य, रंगदीप क्रिएशनचे कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्‌घाटन प्रसंगी रामशेठ ठाकूर यांनी सर्व कलाकारांना प्रोत्साहित करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी कला ही समाजाच्या भावविश्वाला उजाळा देणारी प्रेरणाशक्ती आहे आणि अशा प्रदर्शनांमुळे नव्या पिढीला सर्जनशीलतेची प्रेरणा मिळते, असे सांगितले.
................
गृहसंकुलांच्या समस्यांवर आमदारांच्या उपस्थितीत चर्चा
खारघर (बातमीदार) : सिडकोच्या खारघर व तळोजा वसाहतहमधील आसावरी, बागेश्री, केदार, मारवा, धनश्री व इतर गृहसंकुलांतील विविध समस्यांच्या निवारणासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (ता. १७) रोजी सिडको भवनमध्ये सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटींचे रजिस्ट्रेशन, सुरक्षा, पाणी, स्वच्छता, वीज या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सिडकोतर्फे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्या अंतर्गत अभियांत्रिकी इस्टेट, पाणी व अन्य अधिकारी यांची कमिटी करून त्यांनी पंधरा दिवसाच्या आत या सर्व सोसायटीमध्ये जाऊन प्रत्यक्षात निरीक्षण करून सकारात्मक तोडगा काढण्यासंर्दभात तातडीने कार्यवाही करण्याची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी संकुलातील रहिवाशांच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल, असे आश्वासित केले. तसेच रजिस्ट्रेशनच्या बाबतीत सोसायटीने कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचेही त्यांनी मान्य केले. या फलदायी बैठकीमुळे खारघर व तळोजा परिसरातील सिडकोनिर्मित गृहसंकुलातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांच्या निवारणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com