दिवाळी पहाट तरुणाईचा जल्लोष

दिवाळी पहाट तरुणाईचा जल्लोष

Published on

फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा,
डोंबिवली, ता. २० : सांस्कृतिक शहर अशी डोंबिवलीची ओळख आहे, फडके रोडवरची ‘दिवाळी पहाट’ आणि गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात. या दिवाळी पहाटेच्या निमित्ताने श्री गणेशाचे दर्शन घेऊन दिवाळीचा आनंद केवळ तरुणाईच नाही, तर सर्वच पिढ्या उत्साहाने घेत असतात.

यंदा दिवाळी पहाटनिमित्त सोमवारी (ता. २०) फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला. तरुणाईचा उत्साह वाढविण्यासाठी आणि आपल्या वादनाची कला सादर करण्यासाठी ढोल-ताशा पथकांनीदेखील शहरात ठिकठिकाणी गर्दी केली होती. कडक उन्हाचा मारा झेलत आणि घामाने चिंब भिजत असले तरी तरुणाईचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

दिवाळी पहाटच्या निमित्ताने केवळ तरुणच नाही, तर सर्वच पिढ्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवलीतील फडके रोडवर गर्दी करतात. अनेक लोक सध्या डोंबिवली सोडून दुसरीकडे राहायला गेले असले तरी या दिवशी ते आवर्जून भेटतात. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेत भाविक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन या उत्साहाला द्विगुणित करतात. डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील मंडळी देखील हा उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी येतात. नरक चतुर्दशीला साजरी केली जाणारी ‘दिवाळी पहाट’ आणि गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा हे फडके रोडचे मुख्य आकर्षण असते.

दिवाळीच्या दिवशी ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून फडके रस्त्यावर भाविकांनी यायला सुरुवात केली होती. सकाळी ७ वाजल्यानंतर फडके रोडवरील गर्दी वाढू लागली. ढोल-ताशा वादकांनी देखील सकाळी लवकर येऊन शहरात मोक्याची जागा पटकावून मनसोक्त वादन केले आणि उपस्थितांची मने जिंकली. ढोल-ताशा वादकांचे वादन ऐकण्यासाठी तरुणाईने त्या-त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. अखेर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियंत्रण करण्यास सुरुवात केली. फडके रोडवर जाणारे सर्व उपरस्ते दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने दिवाळी पहाटनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. काही कलाकारांनी आपल्या मालिका आणि चित्रपटांच्या प्रमोशनसाठी डोंबिवलीला भेट दिली.

शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील डोंबिवलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळीच हजेरी लावली. या वेळी शुभेच्छा देताना त्यांनी यंदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगितले. राज्यात ओला दुष्काळ पडला आहे, सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. तरुणांनीदेखील ‘फुल नाही पण फुलाची पाकळी’ देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, विरोधकांना टोला लगावताना त्यांनी, ‘‘दिवाळी आहे, फटाके फोडा, जास्त प्रदूषण करू नका,’’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com