खालापूर प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे

खालापूर प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे

Published on

खालापूर प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे
गर्भवतीची दोन तास हेळसांड; १०८ सेवेची दुरवस्था उघड
खालापूर, ता. २० (बातमीदार) : खालापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. गर्भवती आदिवासी महिलेला अधिक उपचारासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी दोन तास रुग्णवाहिकेसाठी आरोग्य केंद्रात ताटकळत बसण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे
उंबरे येथील गर्भवती आदिवासी महिला अश्विनी वाघमारे (वय २७) हिला रविवारी रात्री तब्येत बिघडल्याने खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र तिचे हिमोग्लोबिन अत्यल्प असल्याने डॉक्टरांनी तिला अधिक उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला, मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अश्विनी आणि तिच्या नातेवाइकांना तब्बल दोन तास ताटकळत बसावे लागले. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. खालापूर आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका दीड वर्षांपूर्वी वडखळ येथे अपघातग्रस्त झाली असून, ती अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. नुकतीच वावर्ले येथून या केंद्रासाठी १०२ क्रमांकाची नवीन रुग्णवाहिका देण्यात आली, मात्र तीदेखील नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे. बॅटरी चार्ज नसणे, स्टेरिंग बिघाड अशी स्थिती या वाहनाची झाली आहे. या परिस्थितीत डॉक्टरांनी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकेशी संपर्क साधला, मात्र त्या वेळी खालापूर हद्दीतील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. दुसरी गाडी पाठवतो, असे सांगण्यात आले; पण ती पोहोचायला तब्बल दोन तास लागले. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णवाहिका आल्यावर अश्विनीला अलिबाग येथे हलवण्यात आले. सुदैवाने तिची प्रकृती स्थिर असल्याने अनर्थ टळला. सामाजिक कार्यकर्ता विकी भालेराव (नडोदे) यांनी सांगितले, की जर त्या वेळी गर्भवतीची प्रकृती आणखी बिघडली असती, तर दोन जीवांशी खेळ झाला असता. रुग्णवाहिकेच्या निष्काळजीबद्दल जिल्हाधिकारी आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या दुर्लक्षाची जबाबदारी ठरवली गेली पाहिजे.
......................
दरम्यान, आरोग्य केंद्राच्या आवारात उभी असलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तत्काळ वापरता आली नाही. कारण त्या गाडीवरील डॉक्टरांनी “ड्युटी संपली” असे सांगितले. दुसरे डॉक्टर ऑनलाइन हजेरी लावल्यावरच गाडी निघाली, तोपर्यंत साडेअकरा वाजले होते. परिणामी रुग्णवाहिका पावणेबारा वाजता निघाली. स्थानिक नागरिकांच्या मते, १०८ सेवेत दोन डॉक्टर तैनात असले तरी ऑनलाइन हजेरीत तासाभराचा ब्रेक घेतला जातो. यादरम्यान, जर रुग्ण अत्यवस्थ झाला, तर जीवाला मुकण्याची शक्यता असते. या त्रुटी तातडीने दूर करून खालापूर तालुक्यातील रुग्णसेवा सुस्थितीत आणावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com