थोडक्यात बातम्या नवी मुंबई
ऐरोलीत पाच हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप
वाशी (बातमीदार) ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऐरोली परिसरात समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सणाचा आनंद मिळावा या हेतूने ‘आनंदाचा शिधा वाटप उपक्रम’ राबविण्यात आला. हा उपक्रम शिवसेना (शिंदे गट)चे कार्यकर्ते साहिल देविदास चौगुले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. ऐरोलीतील समता नगर, छत्रपती कॉलनी, साईनाथवाडी, ऐरोली गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील तब्बल पाच हजार कुटुंबांना या उपक्रमातून धान्य, तांदूळ, डाळ, तेल, साखर, मसाले आणि दिवाळी फराळाचे साहित्य अशा जीवनावश्यक वस्तूंचा शिधा वाटप करण्यात आला. यंदाच्या वर्षी शासनाकडून शिधा वाटप न झाल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये निराशा होती, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धती आणि सामाजिक दृष्टिकोनातून प्रेरित होऊन साहिल चौगुले यांनी हा उपक्रम राबविला. साहिल चौगुले यांनी सांगितले की, शासनाकडून शिधा न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांचा सण फिक्का जाणार होता, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आम्ही स्वतः पुढाकार घेत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात स्थानिक रहिवासी, महिला मंडळ, आणि शिवसेना शिंदेसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिसरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. साईनाथवाडी, छत्रपती कॉलनी, समता नगरपर्यंतच्या भागात या शिधा वितरणाची चर्चा रंगली.
...............
उजळली दिवाळी पहाट शुक्रतारा
नेरूळ, ता. २१ (बातमीदार) ः भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान नवी मुंबई आणि नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमानाने करावे गावातील गणेश मंदिर प्रांगणात ‘‘शुक्रतारा’’ हा दिवाळी पहाटचा सुश्राव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून संगीत मेजवानीचा हा कार्यक्रम निसर्गरम्य वातावरणात सुरांनी उजळला, अशी प्रतिक्रिया श्राेत्यांनी दिली. भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान नवी मुंबई या संस्थेचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई या संस्थेनेही कला क्षेत्रात भरीव काम सुरू केले आहे. दिवाळी पहाटचे हे नववे वर्ष होते. स्थानिक गायक, वादक, संगीत संयोजक यांना संधी देऊन कार्यक्रम यशस्वी केला जातो. श्री गणेश मंदिर देवस्थान व्यवस्थापनही कार्यक्रमास मोलाचे सहकार्य करते. याप्रसंगी माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अजित मगदुम, वाचन चळवळीचे ललित पाठक आणि अनेक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
.................
काँग्रेसच्या वतीने नेरूळ-जुईनगरमध्ये गडकिल्ले व रांगोळी स्पर्धा
नेरूळ (बातमीदार) ः दिपावलीनिमित्त नेरूळ-जुईनगरमधील प्रभाग क्र. २२ मधील रहिवाशांसाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या वतीने गडकिल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ऑक्टोबरदरम्यान रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग २२ मधील रहिवाशांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी करता येईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांची रांगोळी जनजागृती तसेच समाजप्रबोधनात्मक हवी, महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती महागाई, बेरोजगारी, पर्यावरण अशा विषयांवर रांगोळी हवी. ९७०२६०५३२१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर रांगोळीचे छायाचित्र पाठविण्यात यावे. सोबत रांगोळी बनवितानाचा व्हिडिओ पाठविणे आवश्यक आहे. रांगोळी स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक, गॅस शेगडीचे दुसरे बक्षीस, कुकरचे तिसरे बक्षीस याशिवाय सहभागी होणाऱ्या सर्वांनाच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय गडकिल्ले बनविणाऱ्या सर्वोत्कृष्ट तीन संघाना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी सर्वच संघांना बक्षिसाने गौरविण्यात येणार आहे.
...............
करंजाडे परिसरातून मोटारसायकलची चोरी
नवीन पनवेल (बातमीदार) ः पनवेल येथील करंजाडे टी-पॉइंट जवळील पुलाखाली उभी करून ठेवलेली मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पनवेल पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. दैवदीप गालट यांनी त्यांची ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा कंपनीची मोटारसायकल, एमएच ४६ बीटी ३३९७ ही करंजाडे टी-पॉइंट जवळील पुलाखाली उभी केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरी केली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.
------------------------------------------------------
महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
नवीन पनवेल (बातमीदार) ः पनवेल बसस्थानकसमोरील एनएमएमटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. वंदना गराडे या पनवेलवरून नवी मुंबई परिसरात जाण्यासाठी एनएमएमटी बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने घटना घडली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.