मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला

मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला

Published on

मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला
गुणवत्ता निर्देशांक ३३५वर; बीकेसीत सर्वाधिक प्रदूषण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता (एक्यूआय) सोमवारी (ता. २०) चिंताजनकरीत्या घसरली असून, अनेक ठिकाणी ती ‘अत्यंत खराब’ या श्रेणीत नोंदविण्यात आली. काही भागांमध्ये एक्यूआय ३००च्याही पुढे गेल्याने आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे.

एक्यूआयची आकडेवारी मुंबई महानगर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि आयआयटीएमने सोमवारी दिली. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३३५वर पोहोचला आहे, तर देवनार, अंधेरी, विलेपार्ले आणि माझगावसारख्या भागातही एक्यूआयने ‘धोक्याची मर्यादा’ ओलांडल्याचे दिसून आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, डॉक्टरांनी वायू प्रदूषणामुळे श्वसन, हृदय आणि त्वचारोग रुग्णांसाठी तसेच मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी घातक ठरू शकते, असा इशारा दिला आहे. दिवाळीत फटाक्यांचा अविचारी वापर, बांधकाम प्रकल्पातून होणारे प्रदूषण, वाहनांमधून होणारे प्रदूषण, कचरा जाळणे आणि स्थिर हवामान यामुळे प्रदूषण अचानक धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. मुंबईमध्ये बीकेसी, देवनार, अंधेरी पूर्व आणि माझगावसारख्या भागात हवेत पीएम २.५ आणि पीएम १० कणांचे प्रमाण सामान्यपेक्षा पाच पट जास्त नोंदवले गेले आहे.

बीकेसीत सर्वाधिक प्रदूषण
मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित हवा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात नोंदवली गेली आहे, जिथे एक्यूआय तब्बल ३३५ इतका नोंदविला गेला. कुलाबा (२८२), देवनार (२७२), चकाला (२६७), माझगाव (२५४) आणि विले पार्ले पश्चिम (२५२) या भागांमध्येही हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीत आहे.


उपनगरांतही स्थिती चिंताजनक
नेरूळ (२४४), बोरिवली पूर्व (२३९), खेरवाडी बांद्रा पूर्व (२१९), तोंडरे तळोजा (२१८), मालाड वेस्ट (२१७), भायखळा (२१६) आणि वरळी येथील सिद्धार्थनगर (२०९) या ठिकाणीही हवा अत्यंत दूषित आहे.

या ठिकाणी समाधानकारक स्थिती
चेंबूर (१५७), घाटकोपर (१९१), कांदिवली (१६०), शिवडी (१५०) आणि शिवाजीनगर (१४०) या भागांत प्रदूषण मध्यम स्वरूपाचे असले तरी हवेचा दर्जा समाधानकारक नाही. काही ठिकाणी मात्र हवा तुलनेने स्वच्छ असल्याचे आढळून आले. यामध्ये कुर्ला (१२२), महापे (१०५), सायन (११०) आणि वसई पश्चिम (९२) येथे एक्यूआय तुलनेने कमी नोंदविला गेला.

तज्ज्ञांचा सल्ला
सकाळ-संध्याकाळ बाहेर पडणे टाळा.
मास्कचा वापर करा.
घरात हवा शुद्ध करणारी झाडे ठेवा.
लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com