‘स्थानिक’मध्ये महायुतीलाच बहुमत

‘स्थानिक’मध्ये महायुतीलाच बहुमत

Published on

‘स्थानिक’मध्ये महायुतीलाच बहुमत

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास; विरोधकांच्या ‘लवंग्यां’कडे लक्ष देत नाही

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : विरोधकांनी कितीही सुरसुरी-लवंग्या फोडू द्यात. आम्ही काम करतो आणि जनता त्याचे उत्तर मतपेटीतून देते. विरोधकांना आता पराभव दिसत असल्यानेच ते निवडणूक आयोग, ईव्हीएम, महायुतीला दाेष देत फिरत आहेत. महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठाम उभी आहे. त्यामुळे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साेमवारी ठाण्यात व्‍यक्त केला.

ठाण्यातील रहेजा गार्डन येथील दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ‘विरोधक दररोज आरोपांचे फटाके फोडतात. त्यांच्या त्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. आम्ही कामगिरीच्या बॉम्बने विरोधकांचा धुरळा उडवणार आहोत. राज्यातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आमचे लक्ष विकासावर आहे आणि विरोधकांचे काम केवळ आरोप, टीका करणे आहे,’ असा टाेलाही शिंदे यांनी लगावला.

ठाण्यातील तरुणाईचा हा उत्साह आणि जल्लोष महाराष्ट्राचे भविष्य आहे. ही परंपरा स्व. आनंद दिघे यांनी रुजवली आणि आम्ही ती पुढे नेत आहोत, असे शिंदे यांनी सांगितले. गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी ठाण्याचा प्रत्येक सण शक्तीचे प्रदर्शन असते. ठाणेकर हे माझे कुटुंब आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आहे. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची आज मला प्रकर्षाने आठवण हाेत आहे, असेही शिंदे म्हणाले.
संकटात धावून जाणे आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी शिकवले आहे. त्यामुळे आम्ही केवळ बोलत नाही, कृती करतो, असेदेखील शिंदे यांनी या वेळी सांगितले. पूरस्थितीत केंद्राने मोठी मदत केली. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे शक्य झाले, असे शिंदेंनी सांगितले.
----
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी!
शेतकरी संकटात असताना शिवसेना आणि महायुती सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. आम्ही दिलेले वचन पाळले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा पैसा पोहोचत आहे. या पुरात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गाई वाहून गेल्या आहेत. या शेतकऱ्यांना १०१ दुभत्या गायी देण्याचा निर्णय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणे ही आमची संस्कृती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com