‘दिवाळी पहाट’ने वसईकर मंत्रमुग्ध
वसई, ता. २० (बातमीदार) : दिवाळीचा पहिला दिवस, फराळाची मेजवानी आणि त्यातच वसईतील रसिकांना मराठी गीतांचा आस्वाद मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची सांगड निर्माण झाली होती. त्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटत सारेच रसिक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.
वसई पश्चिम येथील सभागृहात सोमवारी (ता. २०) बहुजन विकास आघाडी, मराठी नाट्य रसिक परिवार यंग स्टार्स ट्रस्ट (विरार), वायएमसीए (माणिकपूर) विद्यमाने सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या सुमधुर गाण्यांची दिवाळी पहाट अनुभवण्यासाठी रसिकांची अलोट गर्दी झाली होती. गायक श्रीरंग भावे, प्राजक्ता रानडे, धनश्री देशपांडे, विश्वजीत बोरवणकर यांनी गाणी सादर केली, तर सुसंवादिका म्हणून दीपाली केळकर यांनी गायक, गीतकारांची ओळख करून दिली. वादक प्रशांत लळीत, सागर साठे, विजय तांबे, दत्ता तावडे, सूर्यकांत सुर्वे, अनिल करंजवकर, अभिजित सावंत, बाबू शेट्ये यांची साथ मिळाली.
दिवाळी पहाट कार्यक्रमात माजी महापौर नारायण मानकर, माजी सभापती संदेश जाधव, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, वसई तालुका कला-क्रीडा विभागाचे प्रकाश वनमाळी, कवियित्री ज्योती बालिका, साहित्यिक अशोक मुळे, माजी सभापती वृंदेश पाटील, कोमसापचे वसई अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
गायकांनी गायलेल्या अमृताहुनी गोड नाम तुझे, शब्दावाचून घडले सारे, शब्दाच्या पलीकडे आम्ही आनंदे गडे, नवीन आज चंद्रमा, वल्लव रे नाखवा, त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, बाई माझी करंगळी मोडली, विठू माऊली तू, सूर निरागस, मला सांगा सुख म्हणजे काय असत, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का, चिंब भिजलेले, आता वाजले की बारा अशा अनेक बहारदार गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणली.
आरोग्यमय संदेश
दिवाळी पहाट कार्यक्रमात तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक, महिलांनी उपस्थिती दर्शवली. पहाटे लवकर उठून वसई गाव ते वसई स्थानक असा प्रवास करत मराठी गीतांचा आस्वाद घेण्यासाठी लक्ष्मीकांत दांडेकर (वय ९२) हे रसिक आवर्जून उपस्थित होते व त्यांनी भरभरून दाद दिली. आजही ते लवकर उठून आरोग्य जपत आहेत.
वसईत पूर्वी वास्तव्यास होतो. या भागात गाण्यांचे अनेक कार्यक्रम केले आहेत. येथील रसिक प्रतिसाद देणारा आहे. त्यानिमित्ताने भेटणे होते, आठवणी जाग्या होतात.
- श्रीरंग भावे, गायक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.