मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढला

मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढला

Published on

मालमत्ता करवसुलीचा वेग वाढला
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल ३,२५९ कोटींची वसुली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः पालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीला या आर्थिक वर्षात चांगली गती मिळत आहे. १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत महापालिकेने ३,२५९ कोटी रुपये एवढी वसुली केली आहे. एकूण वार्षिक लक्ष्याच्या जवळपास ४५ टक्के कर संकलन करण्यात आले आहे.
पालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७,३०० कोटी रुपये एवढे वार्षिक कर संकलन वसुलीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यामुळे अजून अर्ध्याहून अधिक रक्कम वसूल करावी लागणार आहे. ठरलेल्या मुदतीच्या आधी थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल करून लक्ष्य ओलांडण्याचे ध्येय कर संकलन विभागाने ठेवले आहे.
मागील आर्थिक वर्षात (२०२४-२५) मुंबई महापालिकेने तब्बल ६,१९८ कोटी रुपये एवढा विक्रमी मालमत्ता कर वसूल केला होता. हा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक महसूल होता. त्यामुळे यंदाही महसुलात विक्रम करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्येक विभागाला वसुलीचे लक्ष्य दिले असून, नागरिकांशी संवाद वाढवून आणि थकबाकीदारांवर नियमानुसार कारवाई करून महापालिकेच्या महसुलात अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालिकेने करदात्यांसाठी ऑनलाइन कर भरण्याची सोय उपलब्ध करून दिली असून, वेळेवर कर भरणाऱ्यांना सवलतींचा लाभ दिला जात आहे. थकबाकीदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. अनेक नागरिकांना देयके उशिराने मिळाल्यामुळे निर्माण होणारी गैरसोय लक्षात घेऊन, देयक वितरणाची प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे.

देयक भरण्याची मुदत नोव्हेंबरपर्यंत
कराची देयके पाठवण्यात थोडा उशीर झाल्यामुळे करदात्यांना देण्यात येणारा ९० दिवसांचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही निवासी सोसायट्या तातडीने कर भरण्याकडे वळल्या असून, अनेक व्यावसायिक कंपन्या व संस्था या कालावधी संपण्यापूर्वी देयके भरणार असल्याचे दिसून येत आहे.

थकबाकीदारांकडे लक्ष केंद्रित
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत करवसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी उर्वरित कालावधीत मोठ्या थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. मालमत्ता कर ही मुंबईच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. वेळेवर कर भरणे ही नागरिकांची जबाबदारी असून, याच माध्यमातून शहराचा विकास घडतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com