थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

जंजिरा मेडिकल असोसिएशनतर्फे मिठाईवाटप
मुरूड (बातमीदार) ः मुरूड नजीकच्या माझेरी तसेच शिघ्रे नवीवाडीच्या आदिवासीवाडीवर दिवाळीनिमित्त जंजिरा मेडिकल असोसिएशनतर्फे मिठाई तसेच थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी जंजिरा मेडिकल अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सचिव डॉ. वासिम पेशइमाम, खजिनदार डॉ. अमित बेनकर, डॉ. मंगेश पाटील, डॉ. राज कल्याणी, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. भाविका कल्याणी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डाॅ. संजय पाटील म्हणाले की, दिवाळी सर्वत्र आनंदाने साजरी केली जाते; परंतु आदिवासीवाडीवर असे चित्र दिसत नाही. म्हणूनच डॉक्टरांनी स्ववर्गणीतून फराळ आणि ब्लँकेट्सचे वाटप करून सामाजिक ऋणातून अशंत: उतराई होण्याचा प्रयत्न जंजिरा मेडिकल असोसिएशनने केला आहे. असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरीब कुटुंबांना आर्थिक मदत असे विविध उपक्रम राबविले जातात.
.....................
भक्तिमय दिवाळी पहाटने पोयनाडकर मंत्रमुग्ध
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. युवासेना अलिबाग तालुका उपाध्यक्ष आणि मित्र परिवाराने या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होत्ते. स्वरांनी सजलेल्या या संगीतमय पहाट कार्यक्रमात ओंकार संगीत मैफलीच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. पोयनाड बाजारपेठेतील भैरवनाथ मंदिरासमोर झालेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमात भक्तिगीते, भावगीते, चित्रपट संगीत, लावणी, गीतरामायणमधील गीत सादर करण्यात आली. या कार्यक्रमात नीलेश थळे, सागर थळे, अमोल थळे, रेश्मा पाटील, दर्शन थळे, जगदीश पाटील, स्वप्नील जाधव आदी कलाकारांनी आपली कला सादर केली. या कार्यक्रमाला रसिका केणी, शैलेश पाटील यांच्यासह, मोठ्या संख्येने नागरिक, महिला, ग्रामस्थ, युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
...................
निजामपूर येथे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम
माणगाव (वार्ताहर) ः राष्ट्रवादी काँग्रेस व बाबुशेट खानविलकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाची दिमाखात सुरुवात झाली. या उपक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कोकण संघटक ॲड. राजीव साबळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला अधिक औचित्य प्रदान केले. कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्यांनी प्रावीण्यप्राप्त सत्कारमूर्तींचा सत्कार केला आणि त्यांच्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या. या वेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक समरसता, एकात्मता आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिक, समाजसेवक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. या दिवाळी पहाट उपक्रमाद्वारे सामाजिक सलोखा जपण्यासोबतच स्थानिक कला, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. ॲड. राजीव साबळे यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधत, समाजातील नवोदित प्रतिभांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर स्थानिक समुदायातील एकात्मता आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले.
..............
आई कनकाई सामाजिक संस्थेकडून फराळवाटप
माणगाव (वार्ताहर) ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आई कनकाई सामाजिक संस्थाने यंदाही आपली सामाजिक परंपरा कायम ठेवत गोरगरिबांना कपडे आणि फराळवाटपाचा उपक्रम राबविला. संस्थेचे संस्थापक आणि रायगड भूषण सुशील कदम यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील हा उपक्रम उत्साहात पार पडला. कदम यांनी सांगितले की, दिवाळी हा आनंदाचा सण आहे, पण समाजातील प्रत्येक घटकाला या आनंदात सामील करून घेणे ही खरी दिवाळी आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन गरजू कुटुंबांना नवीन कपडे, फराळ आणि मिठाईचे वाटप केले. या उपक्रमात स्थानिक नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यात भरत गोगावले आणि विकास गोगावले यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि जनसमुदायात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या आई कनकाई सामाजिक संस्थाने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि क्रीडा या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.
......................
तळा भाजपची आढावा बैठक उत्‍साहात
तळा (बातमीदार) ः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा भाजपची आढावा बैठक उत्‍साहात पार पडली. शहरातील कुणबी सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीत तळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या चारही जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजपने तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेली कित्येक वर्षे तळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत. राज्यात महायुती असली तरी तालुक्यात राष्ट्रवादीकडून मित्र पक्षाला जागा सोडण्याची शक्यता धूसर असल्याने सर्वच पक्ष आपापले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने भाजपच्या आढावा बैठकीत जर पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला, तर तालुक्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे, महिला सरचिटणीस हेमा मानकर, माजी तालुका अध्यक्ष ॲड. नीलेश रातवडकर, शहर अध्यक्ष राकेश कासार यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.............
विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे - हसन मुश्रीफ
माणगाव (वार्ताहर) ः तळाशेत येथील नवजीवन विद्यामंदिर विद्यालयाचे सुनील तटकरे यांच्या नावाने नामविस्तार सोहळा व गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधकाम केलेल्या दोन वर्ग खोल्यांचे उद्‌घाटन नुकतेच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या वेळी हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. ज्ञानदानासारखे भाग्य शिक्षकांना मिळाले आहे. आपली आणि परकी मुले ही एकच आहेत, अशा पद्धतीने ज्ञानदानाचे काम करा. खासदार सुनील तटकरे यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, ज्याच्या मागे धन लागले आहे, अशा सुनील तटकरेंचे नाव हे या इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाने निर्णय घेऊन विद्यालयाला दिले आहे. त्‍यामुळे मी मंडळाचे अभिनंदन व धन्यवाद मानतो. सुतारवाडी सारख्या छोट्याशा गावातून जन्म घेऊन संपूर्ण राज्यामध्ये सामाजिक, राजकीय चळवळीत अतिशय उत्कृष्ट काम केले. तसेच मंत्री कसा असावा आणि आता लोकसभेत निवडून गेलेला खासदार कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे खासदार सुनील तटकरे आहेत. आपल्या जिल्ह्यात तसेच मतदारसंघात खासदार सुनील तटकरे हे प्रामाणिकपणे काम करत आहेत. या वेळी खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे यांचेदेखील मार्गदर्शन झाले.
................
पेण पोलिसांकडून वृद्धाश्रमातील वृद्धांना मिठाईचे वाटप
पेण (वार्ताहर) : दिवाळीनिमित्त शहरातील अहिल्या महिला मंडळ वृद्धाश्रमातील वृद्धांना पेण पोलिसांकडून मिठाईचे वाटप करण्यात आले. पोलिस ठाण्यामार्फत दीपावली व पोलिस स्मृतिदिनाचे औचित्य साधून शहरातील अहिल्या महिला मंडळाच्या वृद्धांना डीवायएसपी जालिंदर नालकूल, पोलिस निरीक्षक संदीप बागुल, पोलिस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांनी येथील ज्येष्ठांना मिठाईवाटप करून त्यांच्याबरोबर जवळपास अर्धा ते पाऊण तास गप्पा मारल्या. त्‍यामुळे येथील वृद्धांना मोठा आनंद झाला. या वेळी पोलिस अधिकाऱ्यांसह दामिनी पथक, गुन्हा प्रकटीकरण विभाग, गोपनीय विभाग यांच्यासह पोलिस ठाण्यातील महिला व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com