ओळखीचा गैरफायदा घेत व्यावसायिकाचे अपहरण

ओळखीचा गैरफायदा घेत व्यावसायिकाचे अपहरण

Published on

उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : उल्हासनगरात गुन्हेगारी जगतातील नवा आणि धक्कादायक ट्रेंड उघडकीस आला आहे. एका व्यावसायिकाचे अपहरण करून डिजिटल माध्यमातून जवळपास तीन लाख रुपये खंडणी वसूल करणारा सराईत गुन्हेगार नरेश छाब्रिया अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. ओळखीचा फायदा घेत पीडिताला सापळ्यात ओढून, टोकदार वस्तूच्या धाकावर बंदिस्त करून मोबाईलद्वारे ऑनलाईन पैसे उकळण्याची ही गुन्हेगारीची नवी पद्धत पोलिसांसमोर आली आहे.
१३ ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास कैलास कॉलनी (कॅम्प ५) येथील रहिवासी अजय आहुजा हे खेमानी परिसरात गेले होते. त्यांच्या ओळखीचे नरेश छाब्रिया यांनी ‘मुलगी आजारी आहे, पैशांची गरज आहे’ असा भावनिक बहाणा करून त्यांना बोलावले. अजय यांनी मदतीसाठी तत्परतेने दुचाकीवर बसून त्याच्यासोबत जाण्यास होकार दिला. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर प्रसंगाने नाट्यमय वळण घेतले. नरेशने अजय यांच्या पाठीवर टोकदार वस्तू लावून धमकावत त्यांना म्हारळ गावातील डम्पिंग खदान परिसरातील एका सुनसान खोलीत नेले. त्या ठिकाणी आधीपासून उपस्थित असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींसोबत संगनमत करून अजय यांना खोलीत बंद केले. त्यांचे हात दोरीने बांधून चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. मानसिक व शारीरिक छळ करत त्यांनी अजय यांच्याकडून त्यांच्या मित्राला फोन करून दोन लाख ९८ हजार ५०० ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडले. प्राण वाचवण्यासाठी अजय यांनी मित्राकडून पैसे ट्रान्सफर करून दिले. या अत्याचारानंतर त्यांनी ताबडतोब उल्हासनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून नरेश छाब्रिया याला अटक करण्यात आली. अटकेदरम्यान आरोपीकडून मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली वस्तू आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत छाब्रियावर यापूर्वीही पाच ते सहा जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com