राज्यातील कलावंताचे दिल्लीतील आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन
राज्यातील कलावंतांचे आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन
दिल्लीत ‘अंतरंगसाधत’ चित्र प्रदर्शन
मुंबई, ता. २१ ः राज्यातील युवा चित्रकार जितेंद्र साळुंके, वीरेंद्र सोनवणे, धनराज पाटील, लक्ष्मीकांत सोनवणे आणि महेंद्र पाटील या पाच चित्रकारांचे ‘अंतरंगसाधत’ हे शीर्षक असलेले चित्र प्रदर्शन २१ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत दिल्लीतील ललित कला अकादमीच्या आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे.
चित्रकार जगण्यातून, अनुभवातून वा परिसरातील घडणाऱ्या घटना दृक माध्यमातून रेखाटतो. चित्र विषयात जगण्यासाठी चाललेला संघर्ष, माणसाच्या जीवनात निरंतर चालत आलेले सुख-दुःखाचे जढ-उतार, सदैव वाट्याला आलेले हलाखीचे जगणे, अशा विषयाला चित्रकार जितेंद्र साळुंके हे शाईने अधिक गडद करून विषयाची तीव्रता परिणामकारकतेने मांडतात. साळुंके यांच्या चित्राचे विषय लोकल ट्रेन, आंदोलन, सामाजिक संघर्ष, आंतरिक दाटलेला कोलाहल, आक्रोश, भयावह शांतता, फेस सेलर, ब्लू फिश, केटली, सनफ्लाॅवरसारखे विषय संवाद साधू पाहतात. दुसरीकडे वीरेंद्र सोनवणे यांची चित्रे निसर्गाशी आंतरिक संवाद साधतात. चित्रकार आणि निसर्ग यांच्यात होणारा आंतरिक संवाद हा त्यांची चित्र पाहिल्यावर उमगते. यात माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते त्यांचे वास्तवतेचे जगणे अशा विषयांना फुले, वेली झाडे, पक्षी या निसर्गातील घटकातून बोधात्मक सुंदर अशी कलाकृती कॅनव्हासच्या माध्यमातून वीरेंद्र सोनवणे अधिक प्रभावीपणे मांडतात.
धनराज पाटील यांची कॅनव्हासवरील गुंफण चित्रे प्रेक्षकांना भावतात. गडद हिरवी, लालसर कोवळी पाने त्यावरील जाळीदार कोरलेली नक्षी जेव्हा चित्र माध्यमातून कागद कॅनव्हासवर उतरते तेव्हा दृक संवेदनाची ओढ निर्माण होते. निसर्गातील झाडांची अवाढव्य मुळं जशी मानवी मनाला जखडून घेतात. तशी झाडाची सळसळणारी कोवळी पाने, फांद्या अशा घटकांना रंगरेषांच्या सूक्ष्म धाग्यातून धनराज पाटील प्रभावी कॅनव्हासवर गुंफतात. शांती, करुणेचा संदेश देणाऱ्या बोधीसत्त्वाचे त्यांच्या बोधी वृक्षाचे पिंपळपान चित्रांचे विषय येतात. पानांवरच्या सूक्ष्म शीरा, उंच झाडांची काळ्या शाईतील बारकाव्यातील डौलदार रेखाटने, हे मनाला मोहक करतात. चित्रात बारकाव्यानिशी केलेले काम, हे पाटील यांचे खास वैशिष्ट्ये म्हणता येईल. तर लक्ष्मीकांत सोनवणे हे मातीच्या जीर्ण भिंतीआड कण्हत जगणाऱ्या अन् नाकारलेल्या माणसांचे आयुष्य कागदावर मांडताना कुटुंब, दारिद्र्य, संघर्ष, जीवनाचा अर्थ, खडतर जीवन जगणारी माणसं, स्त्री-यातना यासह असंख्य विषय प्रेक्षकांसमोर अधिक गडद करतात. त्यांची चित्रे मन सुन्न करतात. त्यांची काळ्या शाईतील रेखाटने बळीराजा, आत्महत्या, अत्याचार, हिंसाचार, स्त्री-पुरषु, व्यवस्थेचे बळी अशा विषयांवर अधिक बोलतात.
महेंद्र पाटील यांची निसर्गचित्रे
महेंद्र पाटील यांच्या चित्रांत उंच इमारती, ऐतिहासिक वाडे, रहदारीने नेहमी वाहणारे रस्ते, मुंबई शहराची तसेच अरुंद गल्लीतील मानवाच्या वस्तींचे प्रसंगातील घटकांवर काढलेल्या व रंगातील समायोजन हे चित्राला आकर्षक बनवितात. जुन्या घडणीच्या इमारती आणि त्यासाठी वापरण्यात आलेली रंगसंगतीमुळे चित्र प्रभावी करतात. यातील काही अमूर्त तसेच निसर्गचित्रे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.