उरण तालुक्यात मुसळधार पाऊस
उरण तालुक्यात मुसळधार पाऊस
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
उरण, ता. २१ (वार्ताहर) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यात बाजारपेठा उत्साहाने सजल्या असतानाच मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने नागरिकांच्या आनंदावर पाणी फेरले. या पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि फेरीवाल्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
सध्या उरण परिसरात भातकापणी व झोडणीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांचे पीक हातात आलेले आहे, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कापलेला भात तसेच झोडणीसाठी सज्ज असलेले पीक भिजले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याने शेतकऱ्यांमध्ये हताशा आणि मानसिक अस्वस्थता पसरली आहे. शेतकरी राम तुपे आणि इतर स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, उभे भातपीक आडवे पडले आहे, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पीक पूर्णपणे नुकसानग्रस्त झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक तणावात सापडेल. दिवाळीनिमित्त बाजारपेठाही सजलेल्या असून, कंदील, पणत्या, रांगोळी, घर सजावटीसाठी लागणारे वस्त्र, कपडे आणि लहान किल्ल्यांसाठी लागणारे मावळे यांची विक्री जोरात सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी सवलती दिल्याने बाजारपेठेत गर्दीचे वातावरण होते, मात्र सायंकाळी अचानक आलेल्या विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वातावरणात एकदम बदल झाला. ग्राहकांनी घराकडे धाव घेतली, तर व्यापारी आणि फेरीवाले पावसात उभे राहून आपला माल वाचवण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रांगोळ्या, पणत्या पावसामुळे भिजल्या आहेत, तर घरांवरील रोषणाई, आकाशकंदील आणि सजावटीच्या वस्तू पावसामुळे खराब झाल्या आहेत. लहान मुलांनी बनविलेले किल्लेदेखील पावसामुळे नष्ट झाले. परिणामी दिवाळीच्या आनंदावर पावसाने विरजन घातले. स्थानिक प्रशासनाला तातडीने नुकसान पंचनामा करावा आणि आवश्यक ती मदत पुरवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.