थोडक्यात बातम्या रायगड
प्रेरणा मतिमंद मुलांच्या शाळेला आग
रोहा, ता. २३ (बातमीदार) : रोहा शहरातील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचालित प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा मंगळवारी (ता. २१) रात्री अचानक भीषण आगीच्या तांडवाने जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य, संगणक, फर्निचर, सीसीटीव्ही, वायफाय सिस्टीम आणि खेळ साहित्य भस्मसात झाले असून, या घटनेमुळे संस्थेला मोठा आर्थिक धक्का बसला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
रात्री साडेआठच्या सुमारास शाळेच्या छपरातून धूर निघताना अंधारआळी शाखाप्रमुख प्रितम देशमुख यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तत्काळ संस्थेच्या अध्यक्षा दर्शना दीपक आठवले आणि शिवसेना (उबाठा गट) तालुका प्रमुख नितीन वारंगे यांना माहिती दिली. देशमुख यांनी कुलूप तोडून स्थानिक युवकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. काही मिनिटांतच एमआयडीसी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेनंतर माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगरसेवक समीर सकपाळ, तसेच शिवसेना श्रीवर्धन विधानसभा अधिकारी राजेश काफरे आणि रविंद्र चाळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अनिकेत तटकरे यांनी शाळेला शक्य ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या घटनेने रोहा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समाजातील संवेदनशील घटकांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रेरणा शाळा ही विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत संस्था असून, या आगीमुळे संस्थेच्या कार्यात तात्पुरती खंड पडली आहे.
..................
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
माणगाव (वार्ताहर) :
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित द. ग. तटकरे महाविद्यालय आणि त्याच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सामाजिक संवेदनशीलतेचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मराठवाडा भागातील अभूतपूर्व पूरस्थितीतील शेतकऱ्यांना मदतीचा हात देत महाविद्यालयाकडून डिझास्टर रिलीफ फंड अंतर्गत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत सततच्या पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाली, शेतजमिनीवरील सुपीक माती वाहून गेली, पशुधन आणि घरांचे मोठे नुकसान झाले. या संकटात बळीराजाला आधार देण्यासाठी महाविद्यालयाच्या विभागाने हा उपक्रम राबवला. संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. बी.एम. खामकर यांच्या नेतृत्वाखाली हा समाजोपयोगी उपक्रम पार पडला. या वेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. नेहा तुराई आणि प्रा. स्वप्निल सकपाळ यांनी आर्थिक मदतीची रक्कम करिअर कट्टा प्रमुख डॉ. बबन सिंगारे यांच्या हस्ते प्राचार्यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली. एनएसएस विभागातील स्वयंसेवक आणि समिती सदस्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या सामाजिक भानावर आधारित या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, शिक्षणासोबत समाजासाठी जबाबदारीची भावना निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, असे प्राचार्य खामकर यांनी सांगितले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि आपत्तीग्रस्तांसाठी संवेदना निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागला आहे.
.............
आई कनकाई सामाजिक संस्थेकडून क्रिकेट खेळाडूंचा गौरव
माणगाव (वार्ताहर) : गांगवली येथे आयोजित उत्साही क्रिकेट सामन्यादरम्यान आई कनकाई सामाजिक संस्था या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देत क्रीडाभावना वृद्धिंगत केली. संस्थेचे संस्थापक सुशील कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमादरम्यान कदम यांनी तरुणांशी संवाद साधत सांगितले की, क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. खेळाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवता येतो, असे त्यांनी मत व्यक्त केले. या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या या उपक्रमामुळे गावातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, खेळाडूंनी आपल्या कार्याची दखल घेतल्याचा आनंद व्यक्त केला. सत्कारानंतर खेळाडूंनी आई कनकाई सामाजिक संस्था व सुशील कदम यांचे मनःपूर्वक आभार मानले. संस्थेच्या प्रोत्साहनामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि भविष्यातही अशाच क्रीडा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा यावेळी खेळाडूंनी व्यक्त केली. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांसह पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेली आई कनकाई सामाजिक संस्था आता क्रीडा क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे संस्थेचे पुढील ध्येय असल्याचे सुशील कदम यांनी सांगितले.
............
खोपोली, ता. २३ (बातमीदार) : दिखोपोलीसह परिसरात मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरा करण्यात आला. बहिणींनी भावांना प्रेमपूर्वक ओवाळणी करत दीर्घायुष्य आणि समृद्धीची प्रार्थना केली, तर भावांनीही आपल्या लाडक्या बहिणींना भेटवस्तू देत स्नेहबंध अधिक घट्ट केले. दिवाळी, पाडवा आणि त्यानंतरची भाऊबीज, या तीनही दिवसांनी शहरातील वातावरण उत्साहाने भरून गेले होते. सकाळपासूनच बहिणींच्या घरांमध्ये पारंपरिक सणासुदीचे वातावरण होते. थाळीत दिवा, ओवाळणीचे साहित्य आणि गोडधोड पदार्थ मांडून बहिणींनी आपल्या भावाचे ओवाळन केले. या प्रसंगी बहिणींनी भावाच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या भरभराटीसाठी देवाकडे प्रार्थना केली.
..................
रायगड दिंडी कार्तिकी पायी तीर्थयात्रेचे भव्य स्वागत
माणगाव (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील पारंपरिक कार्तिकी पायी दिंडी तीर्थ यात्रा २०२५ यावर्षीही अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली. यात्रेच्या दरम्यान दिंडीचे स्वागत कोशिंबळे गावात मोठ्या जल्लोषात करण्यात आले. समाजसेवक विजय बक्कम यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करून स्थानिक ग्रामस्थ व भक्तगण यात्रेला सामील झाले. या प्रसंगी सहदेव बक्कम (माजी सरपंच), संजय बक्कम, संगीता बक्कम, सभापती दीपक उभारे, उपसरपंच सुषमा बक्कम, नागेश शेंपुडे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावभर पारंपरिक ढोल-ताशा, टाळ-मृदुंग आणि विठ्ठलनामाचा गजर चालू होता, ज्यामुळे गावात आध्यात्मिक वातावरण होते. महाप्रसादात शेकडो भाविक सहभागी झाले आणि विठ्ठल नामस्मरणाचा आनंद घेतला. विजय बक्कम यांनी सांगितले, की गेल्या दोन दशकांपासून चालत असलेली ही सेवा खरी भक्ती आणि समाजसेवेचे सुंदर उदाहरण आहे. दिंडी यात्रेचा हा टप्पा केवळ धार्मिक सोहळा नसून एकात्मता, श्रद्धा आणि सेवाभावाचे प्रतीक ठरला.
..................
श्रीवर्धनमध्ये ‘काव्यरंग’ कार्यक्रमाला प्रतिसाद
श्रीवर्धन (वार्ताहर) : कोकण मराठी साहित्य परिषद, श्रीवर्धन शाखेच्या वतीने काव्यरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्री दत्त मंदिर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती कोमसाप जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ यांची होती. कार्यक्रमात गंगाधर साळवी, संध्या दिवकर, प्रणय इंगळे आणि सिद्धेश लखमदे यांनी कविता, पोवाडा आणि गझल सादर केले. कार्यक्रमाची सुसंवादकाची जबाबदारी हेमंत बारटक्के यांनी पार पाडली. जिल्हाध्यक्ष गुंजाळ यांनी सांगितले की, शाखा दरवर्षी विविध साहित्य उपक्रम राबवत असून, आजच्या ‘दीपसंध्या’ कार्यक्रमामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले. श्रीवर्धन शाखेची स्थापना २००४ रोजी झाली असून, त्यानंतर महाविद्यालयीन स्पर्धा, चर्चा सत्रे, दिवाळी पहाट, गीत गायन, काव्यवाचन, कथाकथन, साहित्य दरबार यांसारखे अनेक उपक्रम आयोजित केले जातात.
...................
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लवकरच पूर्णत्वास
श्रीवर्धन (वार्ताहर) : श्रीवर्धन नगरपरिषदेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रॉन्झ धातूपासून अश्वारूढ पुतळा उभारला जात असून लवकरच तो पूर्णत्वास येणार आहे. शिवसृष्टीमुळे श्रीवर्धनकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. पर्यटन क्षेत्रात ‘ब’ दर्जा प्राप्त श्रीवर्धन शहरातील मठाचा गवंड परिसर, जीवनाबंदर येथील आधुनिक जेटी आणि कोळीवाडा येथील ग्रोयन्स पद्धतीचा बंधारा, या सर्वांच्या विकासामुळे शहराचे महत्त्व वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेबारा फुट उंचीचा ब्रॉन्झ इफेक्ट पुतळा मध्यभागी उभारण्यात येत आहे, ज्याचे जोते जवळपास पूर्ण झाले असून बुरूज बांधकाम सुरू आहे. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू फ्लॅग पायलट मानांकन प्राप्त असून, शहराचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे. भविष्यात हा प्रकल्प पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रात शहरासाठी आकर्षक केंद्र ठरणार आहे.
..................
अवेळी पाऊसाने तळ्यात भातशेतीचे मोठे नुकसान
तळा, ता. २३ (वार्ताहर) : तालुक्यात मंगळवारी आलेल्या अचानक पावसामुळे भातशेतीला मोठा धोका निर्माण झाला. कापणीसाठी तयार असलेले भाताचे पिके पाण्यात बुडल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे श्रम नासधूस झाले. शेतकऱ्यांनी या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. भात कडपे भिजली की उन्हात वाळवणे कठीण होते आणि चार-पाच दिवस पाऊस पडत राहिला तर उत्पादन पूर्णपणे नष्ट होते. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार आणि मानसिक ताण वाढत आहे. अनेक शेतकरी या परिस्थितीत शासन आणि विमा यंत्रणेकडे सहारा म्हणून पाहत आहेत. अधूनमधून पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या निर्माण करत असून, भात कापणीसाठी योग्य वेळ निश्चित करणेही आव्हान ठरत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान आणि सामाजिक तणाव वाढला आहे, तसेच या परिस्थितीवर तत्पर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.