शालेय अभ्यासक्रमांत ‘कृषी’चा विषय बारगळला

शालेय अभ्यासक्रमांत ‘कृषी’चा विषय बारगळला

Published on

शालेय अभ्यासक्रमांत ‘कृषी’चा विषय बारगळला
दीड वर्षात अभ्यासक्रमाची अंमलबजावणीसाठी कार्यवाही नाही

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रम लागू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला; मात्र दीड वर्षानंतरही या विषयाची शालेय शिक्षणात प्रभावी अशी अंमलबजावणी होऊ शकली नाही. हा निर्णय केवळ कागदावर राहिल्याने शालेय शिक्षणात कृषीच्या अभ्यासक्रमाचा विषय बारगळला असल्याचे समोर आले आहे.

२००६पासून शालेय अभ्यासक्रमात कृषी अभ्यासक्रमाचा समावेश व्हावा, यासाठी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी अहवाल दिला होता, तेव्हापासून राज्यात शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रम लागू करण्यासाठी केवळ समित्या आणि मसुदेच जाहीर करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी दिरंगाई होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मे २०२३च्या अखेरीस शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात तिसरी‍ ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कृषीविषयक अभ्यासक्रम एकात्मिक पद्धतीने समाविष्ट करून कृषी अभ्यासक्रमात श्रेणीऐवजी गुण अनिवार्य करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. यासाठी कृषी महाविद्यालयातील १२ प्राध्यापकांच्या उपसमितीने विषयासाठी दोन मसुदेही तयार करून दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथील तज्ज्ञांची संयुक्त समिती गठित करून याविषयी सविस्तर प्रस्तावही तयार करण्यात आला होता; मात्र अकरावी-बारावीच्या द्विलक्षी अभ्यासक्रमांचा अपवाद वगळता तिसरी ते बारावीच्या मूळ अभ्यासक्रमात काही अपवादानेच कृषीचा विषय आणला गेला; मात्र त्याला पूर्ण न्याय मिळाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


-
अद्यापही मंजुरी प्रलंबित
महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे (एमसीआर) डॉ. देशमुख यांच्या अहवालानंतर अभ्यासक्रम अधिक सोपा करण्यासाठी दोन समित्या तयार करण्यात आल्या. त्यानंतर डॉ. पवार समितीनेही त्यावर काम केले, काही अभ्यासक्रम तयार झाला असला तरी त्यांच्या मूळ मसुद्याला एमसीआरच्या बैठकीत सादर करून अद्यापही मंजुरी मिळाली नाही. यासाठी मंत्री, कार्यकारी परिषदेची बैठक होऊनच हा विषय मार्गी लागू शकतो, अशी माहिती कृषी विभागातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.


‘कृषी’ची आवड निर्माण करण्याचा उद्देश
शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी अभ्यासक्रम विविध प्रकारे शिकवला जात आहे. यात सहावीच्या विज्ञान तसेच द्व‍िलक्षी शाखांमध्ये यासाठीचे महत्त्वाचे विषय सुरू आहेत. विद्यार्थ्यांना कृषीविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांचा कल या क्षेत्राकडे झुकावा, असे अनेक चांगले उद्देश यामागे असल्याची माहिती एससीईआरटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


२००६ मध्ये पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंत कृषी अभ्यासक्रम सुरू करण्याची शिफारस करणारा अहवाल मी सरकारला दिला होता. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा कल शेतीकडेही झुकावा, त्यांना शेतीसंदर्भात माहिती असावी, असा यामागे उद्देश होता. शेतीशी नाळ असलेले अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमात आवश्यक आहेत. यातून रोजगारापासून शेती विकासाचे अनेक विषय हाताळण्यास मदत होऊ शकेल.
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, कृषी विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com