बलिप्रतिपदेला गुरे पळवण्याची प्रथा
बलिप्रतिपदेला गुरे पळवण्याची प्रथा
नेरळसह कर्जत तालुक्यात जपली जाते परंपरा
नेरळ, ता. २३ (वार्ताहर) : दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा ग्रामीण भागात आजही उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे, या दिवशी गुरे पळवण्याची प्रथा कायम आहे. पूर्वापारपासून चालत आलेली ही प्रथा आजही गावकऱ्यांमध्ये जोपासली जाते. या परंपरेत गुरांना चांगले सजवून गावातील एका ठिकाणी पेंढ्याची सौम्य आग लावून त्या आगेपुढे गुरांना वाजतगाजत पळवले जाते.
स्थानिक सांगतात की, यामागे शास्त्रीय कारणही आहे. गुरांच्या अंगावरील जंतू धुरामुळे निघून जातात आणि गुरांमध्ये आगीची भीती कमी होते. तसेच, रानात गुरे चरताना वणवा पेटल्यास ते सैरभैर होत नाहीत. त्यामुळे बलिप्रतिपदेला गुरांना आगीवरून पळवणे ही भीती कमी करण्याची प्रथा मानली जाते.
ग्रामीण भागात गुरांना शेतकऱ्यांसाठी त्यांच्या लहान मुलासारखे मानले जाते. जरी आज शेतामध्ये ट्रॅक्टरच्या यंत्रणेमुळे नांगराची आवश्यकता कमी झाली असली तरी गुरांची जोपासना अजूनही कायम आहे. गुरांना सकाळी अंघोळ घालून रंगवले जाते, शिंगांना सजवले जाते, पाय व गळ्यात फुलांच्या माळा आणि घुंगरू लावले जातात. नंतर गावभर वाजतगाजत गुरांची वरात काढली जाते. कर्जत तालुक्यातील नेरळ, धामोते, कोल्हारे, कोंदीवले, अवसरे, बोरगाव, सुगवे, कशेळे, खांडस, शिलार, मोग्रज, गौरकामथ, वैजनाथ, बार्डी, कडाव अशा गावांमध्ये ही परंपरा आजही जपली जात आहे. विशेष म्हणजे, बैलगाडा शर्यतीत प्रसिद्ध असलेले मेहबूब, लक्ष्या, बादल, बकासुर, लाडू, बॉस, वादळ यांसारख्या बैल मालकांनी आपल्या बैलांसह या परंपरेत सक्रिय सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातील ही परंपरा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक नाही, तर गावकऱ्यांमध्ये एकात्मता, उत्साह आणि पारंपरिक शेतकरी जीवनाशी जुळलेले नातेही दर्शवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.