आठवडाभर दिपावसाळी
आठवडाभर दीपावसाळी
दक्षिणेतला मॉन्सून मुक्कामी : दिवाळीच्या उत्साहावर गरगराटी पावसाचे पाणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा करण्याच्या उत्साहावर सध्या गरगराटी पावसाने पाणी फेरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून विजेचा कडकडाट आणि वाऱ्यासह ऐन दिवे लावण्याच्या वेळेला सायंकाळी बरसणाऱ्या पावसाने सर्वांचीच तारंबळ उडवली आहे. दक्षिण भारतात सुरू झालेल्या मॉन्सूनचा पाऊस आपल्याकडे दिवाळी पाहुणा आणखी आठवडाभर मुक्कामी राहणार आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असल्याने दीपावसाळा अनुभवायला मिळणार आहे.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. आकाशकंदील, आकर्षक रोषणाई, फराळ, गाठीभेटींचा हा सण; पण ऐन दिवाळीत तेही सर्वत्र लक्ष्मीपूजनाची गडबड सुरू असताना पावसाने हजेरी लावली. सायंकाळी वादळासह सुरू झालेल्या पावसाने मुंबई, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला तासाभरात झोडपून काढले. बदलापुरात ढगफुटी होऊन शंभर मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबरलाही सायंकाळी पावसाने १५ मिनिटांसाठी हजेरी लावली. या वेळी ठाणे जिल्ह्यात सुमारे २९.९ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ४५ मिमी पाऊस उल्हासनगर तालुक्यात झाला. भिवंडी, मुरबाड, शहापूर तालुक्यांमध्ये यामुळे काही घरांची पडझड झाल्याची नोंद आहे; पण सर्वाधिक नुकसान बाजारपेठांचे झाले. हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांच्या सामानाचा चिखल झाला आहे. एकंदरीत दिवाळीच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले आहे; पण ही स्थिती ३० ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील मुख्य मॉन्सून १० ऑक्टोबरलाच परतला आहे. नवरात्री आणि दसऱ्याला पडालेला पाऊस हा परतीचा होता. त्यामुळे हा परतीचा पाऊस नसून तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील उत्तरपूर्व मॉन्सूनचा परिणाम असल्याचे मोडक यांनी सांगितले. महाराष्ट्रात साधारण जून ते सप्टेंबरपर्यंत मॉन्सून बरसतो. ऑक्टोबरच्या मध्यानला तो परततो. तर तमिळनाडूमध्ये १५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर हा मॉन्सून कालावधी असतो. दक्षिण भारतात कमी दाबाचे पट्टे यादरम्यान तयार होतात. आपल्याकडे त्याचा फारसा परिणाम होत नाही. कारण आपल्याकडे उत्तरेकडून यादरम्यान कोरडे वारे येण्यास सुरुवात होते; पण यंदा ही प्रक्रिया कमकुवत पडली आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून येणाऱ्या बाष्पीभवनाने आपल्या इथे जम धरला आहे. बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून बाष्पीभवन होत असल्याने तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात सध्या पाऊस सुरू आहे. दोन्हीकडे असणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि नॉर्थईस्ट मॉन्सून यामुळे पाऊस मुक्कामी आल्याची माहिती अभिजित मोडक यांनी दिली.
‘गरगराटी पाऊस’ म्हणजे काय?
गेल्या दोन दिवसांत ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. बदलापूरमध्ये तर एका तासात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, कधी गारपीट ही स्थिती ‘गरगराटी पाऊस’ म्हणून ओळखली जाते. स्थानिक पातळीवर दोन दिशांच्या हवेच्या प्रवाहात होणाऱ्या घर्षणामुळे ढगांचे थर १२ ते १५ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचतात. वाऱ्याचा वेग कमी असल्यास ढग स्थिर राहतात आणि अल्पावधीत जोरदार पाऊस पडतो. मे महिन्यात पडणारा वळवाचा पाऊसही याच स्वरूपाचा असतो. अशा वेळी विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट तीव्र होतो. त्यामुळे नागरिकांनी या काळात घराबाहेर जाणे टाळावे, असा सल्ला मोडक यांनी दिला.
हिवाळ्यावर परिणाम नाही
ऑक्टोबरमध्ये उष्णतेमुळे जमिनीवरील हवा वर उचलली जाते आणि दुपारनंतर पाऊस होतो; परंतु हा बदल तात्पुरता असून, हिवाळ्यावर त्याचा परिणाम होणार नाही. ठाणे-मुंबई परिसरात नोव्हेंबरअखेरपासून थंडीची चाहूल लागेल आणि डिसेंबरनंतर हिवाळा जोर पकडेल, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.
आगामी हवामानाचा अंदाज
पुढील आठवडाभर महाराष्ट्रात संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात आता कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्याची दिशा ठरल्यावरच पावसाची तीव्रता स्पष्ट होईल, असे मोडक यांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्ये पावसाचा शिरकाव
२०१२ पासून दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात असा ‘गरगराटी पाऊस’ अनुभवास येतो आहे. गेल्या वर्षी २० ऑक्टोबरला ठाण्यात अर्ध्या तासात ५५ मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसाला स्थानिक भाषेत ‘हस्त नक्षत्राचा पाऊस’ असेही म्हणतात; मात्र सध्याच्या स्थितीनुसार, शनिवार-रविवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत राहील, असा अंदाज मोडक यांनी व्यक्त केला आहे.
पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
कल्याण २८
भिवंडी ७
शहापूर २४
ठाणे ५
अंबरनाथ ३२
मुरबाड १२
उल्हासनगर ४५
................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.