प्रशासकीय दुर्लक्षाचा अतिरेक!

प्रशासकीय दुर्लक्षाचा अतिरेक!

Published on

प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा
भाईंदर, ता. २३ : काशी मिरा भागातील डाचकूल पाडा येथील झोपडपट्टी भागात दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर येथे होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या परिसरात वाढत असलेल्या अनधिकृत चाळी व झोपड्यांमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक राहायला येतात, मात्र काहीवेळा होत असलेल्या किरकोळ कारवाईचा अपवाद वगळता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या वाढत्या झोपड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी प्रशासकीय दुर्लक्षामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

महिलांची छेड काढण्याच्या मुद्द्यावरून डाचकूल पाडा येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली, तसेच त्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षांचीदेखील मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. या वेळी काही तरुणांच्या हातात लाठ्या-काठ्या, तसेच काही जणांच्या हाती धारदार शस्त्रेदेखील होती. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. डाचकूल पाडा, माशाचा पाडा येथे मूळची आदिवासींची वस्ती आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असून, पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. आदिवासी पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहात आहेत, मात्र त्यांचा अपवाद वगळता या ठिकाणी बांधकाम करायला परवानगी नाही. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून या आदिवासी पाड्यांच्या भोवताली मोठ्या प्रमाणात चाळी व झोपड्यांची अनधिकृत बांधकामे होऊ लागली आहेत. या झोपड्यांना पिण्याचे पाणी, वीजजोडणीदेखील सहज मिळत आहे.

या ठिकाणी ‘झोपडपट्टी दादा’ तयार झाले असून, त्यांना राजकीय आशीर्वाददेखील आहे. ते बांधत असलेल्या चाळी व झोपड्यांच्या मागे मोठे अर्थकारण दडले असल्यामुळे त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईदेखील होत नाही. कारवाई झाली तरी ती केवळ दिखाव्यापुरतीच होते, असे आरोप प्रशासनावर होतात. फारच तक्रारी झाल्या तर केवळ काही झोपड्या तोडण्याची किरकोळ कारवाई केली जाते, मात्र तोडण्यात आलेल्या चाळी व झोपड्या पुन्हा काही दिवसांतच उभ्या राहतात. राजकीय आशीर्वाद, मतांचे राजकारण व अनधिकृत बांधकामांमागील अर्थकारण यामुळे या ठिकाणी कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशविघातक प्रवृत्तीची दहशत
काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी धडक कारवाई करत या भागातील सर्व अनधिकृत झोपड्या उद्ध्वस्त केल्या होत्या, मात्र त्यानंतर मोठी कारवाई झालेली नाही. येथील चाळी व झोपड्यांमधून गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आश्रयाला येऊ लागले आहेत. बऱ्याचदा बाहेरच्या राज्यात गुन्हे करून फरार झालेले आरोपीदेखील या ठिकाणी सापडले आहेत. काही देशविघातक प्रवृत्तीदेखील या ठिकाणी राहायला येण्याची भीती आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मोठी दहशत परिसरावर आहे. त्यातूनच हाणामारीसारखे प्रकार वाढीस लागले आहेत.

मंत्र्यांकडून दखल
मिरा-भाईंदरमध्ये अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. या व्यवसायात झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग असल्याबाबतची शंका खुद्द परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांवर वेळीच कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे.

डाचकूल पाडा, माशाचा पाडा परिसरातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात येईल व त्यावर उचित कारवाई केली जाईल.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com