कासा बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न

कासा बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न

Published on

कासा, ता. २३ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्यमार्गालगत असलेल्या कासा बाजारपेठेत सध्या तीव्र वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्यावरच बँका, दवाखाने, शाळा-महाविद्यालय, दुकाने आणि शासकीय कार्यालये असल्याने येथे नेहमीच मोठी गर्दी असते, परंतु योग्य पार्किंगची सोय नसल्याने वाहनचालक आपली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. परिणामी संपूर्ण रस्ता अडवला जातो आणि दिवसभर वाहतूक ठप्प राहते.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके, रंग, मेणबत्त्या, भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. सुमारे ३० ते ३५ गावांमधून खरेदीदार कासा येथे येत असल्याने गर्दीचा ताण अधिक वाढला आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कासा उपजिल्हा रुग्णालयासमोर बेकायदा उभ्या असलेल्या वाहनांमुळे रुग्णवाहिकांना मार्ग मिळत नाही. त्यामुळे अपघातग्रस्त वा गंभीर रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवताना अडथळे निर्माण होतात. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, तलाठी कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांजवळही अशीच स्थिती आहे.

कासा येथील ज्येष्ठ नागरिक श्रावण गावित म्हणाले, कोंडीतून रस्ता ओलांडणे आमच्यासारख्या वृद्धांसाठी धोकादायक ठरत आहे. मी दोनवेळा अपघातग्रस्त झालो आहे. वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

सायवन रस्त्यावर अनेक प्रवासी रिक्षा मुख्य रस्त्यावर उभ्या राहतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो आहे. याशिवाय शेलवास व ठाणे-नाशिककडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. या समस्येमुळे नागरिकांत तीव्र नाराजी असून, तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.

लवकरच कारवाई होणार!
कासा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले की, कासा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. पोलिस विभाग व बांधकाम विभागास यासंदर्भात कळविले असून, लवकरच संयुक्त कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com