महेश गवळीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महेश गवळीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Published on

महेश गवळीचा अटकपूर्व जामीन फेटाळला
जमीन व्यवहार फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः गुन्हेगारी जगतातून राजकारणाची कास धरलेला अरुण गवळीचा मुलगा महेशला अटकपूर्व जामीन देण्यास नुकताच सत्र न्यायालयाने नकार दिला. जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर महेशवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


गुन्हा दाखल केल्यानंतर महेशने अटकेच्या भीतीपोटी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी महेशचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. तक्रारदार आणि महेश यांच्यामध्ये थेट संबंधाचा कोणताही प्राथमिक पुरावा नसला तरी तपासात पोलिसांना सहकार्य न करणे हे अटकपूर्व जामीन फेटाळण्याचे मुख्य कारण असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.  तसेच, महेश हा चौकशीसाठी केवळ एकदाच पोलिस ठाण्यात गेला, त्याने आवश्यक कागदपत्रे आणि माहिती देण्याचे टाळले. तक्रारदार आणि गवळी यांच्यातील मोठ्या रकमेचा आणि संशयास्पद व्यवहारांचा विचार करता महेशची कथित गुन्ह्यात भूमिका निश्चित करण्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे याच कारणास्तव त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. नैना देवळेकर यांच्या तक्रारीनुसार, मोतीलाल ओसवाल कंपनीसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या भक्ती कांडारकरने दरमहा दहा टक्के व्याज देण्याच्या आश्वासनासह तिला गुंतवणूक योजना देऊ केल्या. आणखी एक आरोपी अक्षय कांडारकरनेही देवळेकर यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून, देवळेकरांनी सुमारे १.१ कोटी रुपये गुंतवले; परंतु त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याचे समजताच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि देवळेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.  पोलिसांनी बँक नोंदी तपासातून भक्ती आणि अक्षय कांडारकर यांनी लोणावळास्थित अरुण गवळीच्या मालकीच्या जमिनीच्या १.१० कोटी रुपयांच्या भूखंडाबाबत संपर्क साधला होता. आरोपी आणि गवळी यांच्यात एक सामंजस्य करार झाला होता आणि त्यांना १६ लाख रुपये दिले होते. तथापि, हीच जमीन गवळीने नंतर अनेकांना विकून ही मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांनी केला.


जमिनीचे मूळ मालक वेगळे
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, संबंधित मालमत्ता ही मूळतः हौसाबाई आणि शांताबाई गायकवाड यांच्या मालकीची होती. त्यांनी अरुण गवळीला विशेष पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे दिली होती. त्या वेळी गवळी हा शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात होता. तथापि, तुरुंगात असताना गवळीने पत्नी आणि मुलगा महेशच्या नावे दोन पॉवर ऑफ ॲटर्नींची अंमलबजावणी केल्याचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com