बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यावधीची फसवणूक

बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यावधीची फसवणूक

Published on

बनावट ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक
उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्याला एक कोटी १३ लाखांचा फटका
उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : दुहेरी नफा आणि खात्रीशीर परतावाच्या गोड प्रलोभनाला बळी पडून उल्हासनगरमधील एका ५७ वर्षीय व्यापाऱ्याने आपली आयुष्यभराची जमापुंजी गमावली आहे. ‘अपस्टाॅक्सप्रो’ नावाच्या बनावट गुंतवणूक ॲपच्या माध्यमातून तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांची ही मोठी ऑनलाइन फसवणूक झाली असून, याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील या व्यापाऱ्याला एका अनोळखी क्रमांकावरून ‘अपस्टाॅक्सप्रो’ नावाचे ॲप डाऊनलोड करण्याची लिंक पाठवण्यात आली. या ॲपद्वारे ‘आयपीओ’ आणि प्रीमियम शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास काही दिवसांत दुप्पट नफा मिळेल, असे त्याला सांगण्यात आले. आकर्षक इंटरफेस आणि मोठ्या नफ्याच्या आकड्यांना भुलून तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने एक कोटी १३ लाख ९५ हजार ३५ रुपये गुंतवले. काही दिवसांनी ॲपवर त्याचा बॅलन्स एक कोटी ४० लाख इतका झाल्याचे दाखवण्यात आले.

जेव्हा तक्रारदाराने नफ्याची रक्कम आपल्या खात्यात काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला ‘विथड्रॉल ॲक्टिव्हेशनसाठी पाच लाख अतिरिक्त भरावे लागतील’ असा संदेश आला. यामुळे त्यांना संशय बळावला. त्यांनी ॲपची अधिक माहिती पडताळली असता, वेबसाईट बंद, ग्राहकसेवा क्रमांक निष्क्रिय आणि कंपनीचा पत्ता बनावट असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

‘‘गुंतवणुकीच्या प्रलोभनातून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. कोणतीही अनोळखी ॲप, वेबसाईट किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका. ‘फक्त काही दिवसांत दुप्पट नफा’ मिळवून देणारे ॲप्स हे सायबर ठगांचे नवे हत्यार आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत रजिस्ट्रेशन आणि परवाना तपासणे अत्यावश्यक आहे.’’
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com