दिवाळीनंतर पुन्हा स्थलांतर
कासा, ता. २८ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील अनेक आदिवासी व कातकरी कुटुंबे दिवाळी सण साजरा करून आता पुन्हा रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. सणानिमित्त आठवडाभर गावी राहून आप्तेष्टांना भेट दिल्यानंतर पुन्हा पोटापाण्यासाठी ही कुटुंबे गाव सोडून इतर ठिकाणी निघाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गाव-पाडे ओस पडले आहेत.
सारणी, पिंपळशेट, शेल्टी, वरोती, महालक्ष्मी, वधना, ओसरवीरा, सायवन, बापगाव, थेरोंडा, वांगर्ज आदी भागातील अनेक गरीब आदिवासी कुटुंबे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थलांतरित होतात. हातावर पोट असलेल्या या कुटुंबांना सणासुदीच्या दिवसाखेरीज गावी फारसा रोजगार मिळत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर शेतकरीवर्गाची कामे संपल्यावर ही कुटुंबे भिवंडी, वसई, विरार, ठाणे, मुंबई परिसरातील वीटभट्ट्या, बांधकामे, कारखाने आदी ठिकाणी कामाच्या शोधात जातात. तेथे होळीपर्यंत काम करून पुन्हा गावाकडे परततात आणि पावसाळ्यापर्यंत मिळालेल्या मजुरीवर उदरनिर्वाह करतात.
या वर्षी दीर्घकाळ चाललेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळाले नाही, परिणामी, शेतमजुरांनाही काम मिळाले नाही. त्यातच अद्याप रोजगार हमीची कामे सुरू नसल्याने गावात मजुरीची संधी कमी झाली आहे. त्यामुळे बाहेरगावी जाऊन मजुरी करणे अनेकांसाठी गरजेचे बनले आहे.
योजनांचा लाभ शून्यच
सरकारकडून बांबू लागवड, सुलभ कर्ज योजना, लघुउद्योग अनुदान यांसारख्या योजना राबवल्या जात आहेत; मात्र त्यांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, दरवर्षी हजारो आदिवासी व कातकरी कुटुंबे रोजगाराच्या शोधात आपले गावे सोडून स्थलांतरित होत आहेत.
दिवाळीसाठी आम्ही गावाकडे आलो होतो. आता सण आटोपल्यावर पुन्हा वीटभट्टीवर कामासाठी भिवंडीकडे जातोय. मी, बायको, दोन मुले, बहीण आणि तिचा नवरा असे आम्ही सर्वजण तिथे काम करतो. तेथे राहण्याची, खाण्याची सोय मालकाकडून केली जाते आणि आगाऊ पैसेही दिले जातात. त्यामुळे दरवर्षी आम्ही तिथेच जातो.
आम्हाला दिवाळी झाल्यानंतर कामधंद्यासाठी बाहेर स्थलांतरित व्हावे लागते. फक्त आई-बाबांना घरी ठेवून आम्ही नवरा, बायको व मुले घेऊन बाहेरच्या ठिकाणी कारखान्यात काम करायला जातो. तेथे मजुरी चांगली मिळते. त्यामुळे आम्ही दरवर्षी गावातील शेतीची कामे आटोपून पोटापाण्यासाठी काम करण्यासाठी जातो.
- नितीन तल्ला, स्थलांतरित कामगार
गावात रोजगार हमीची कामे वेळेवर सुरू होत नाहीत आणि मजुरीही उशिरा मिळते. त्यामुळे लोक बाहेरगावी जातात. शासनाने जर वेळेवर रोजगार उपलब्ध करून दिला, मजुरी दर वाढवले आणि स्थानिक स्तरावर उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले, तर स्थलांतराचे प्रमाण कमी होईल.
- शैलेश करमोडा, सरपंच, धानिवरी ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

