‘हॅलो’मी बँकेतून बोलतोय...
‘हॅलो, मी बँकेतून बोलतोय...’
समाजमाध्यमांवर सायबर चोरांचे फसवणुकीचे जाळे
नवीन पनवेल, ता. २८ (बातमीदार) ः केंद्र, राज्य शासनाच्या योजनांसंदर्भात समाजमाध्यमांवर अर्ज भरणे, केवायसीसह आधार लिंक, योजनेचे हप्ते बँकेमध्ये कधी जमा होणार, अशा अनेक गोष्टींचा खुलासा होतो. याच गोष्टीचा फायदा घेत सायबर चोर गंडा घालण्याचे फंडे शोधत असतात. सध्या ‘मी बँकेतून बोलतोय, सध्या तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे,’ असे सांगून ज्येष्ठांना गंडवले जात आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी जागोजागी फलकाद्वारे जनजागृती करीत सावधतेचा इशारा दिला आहे.
सायबर चोरांच्या जाळ्यात सापडलेल्यांमध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्त, ज्येष्ठ महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. त्याचबरोबर अनेक तरुणही प्रलोभनांना बळी पडताना दिसत आहेत. नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळे फंडे काढत असल्याचे आढळून आले आहे. राज्यामध्ये वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल शहर परिसरात जागोजागी केवायसीच्या नावाखाली कशी फसवणूक होऊ शकते. याकरिता काय दक्षता उपाययोजना करण्याबाबत फलकांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते आहे.
----------------------------------
अशी घ्या काळजी...
- अपरिचित फोन, एसएमएस, लिंक हे खोटे किंवा फसवे आहेत समजा.
- कोणतीही बँक अथवा बँक अधिकारी ग्राहकांना फोन करून केवायसी अपडेट करा, असे सांगत नाही.
- कोणत्याही अपरिचित व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.
- समक्ष जाण्याचा कंटाळा करू नका.
--------------------------------
फसवणूक झाल्यास...
तत्काळ https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. त्वरित १९३०/१५५२६० या नंबरवर संपर्क साधा. ही यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करेल. येथे फोन करण्याआधी पैसे ट्रान्स्फर व्यवहाराचा संदर्भ नंबर (Transaction ID) तयार ठेवा.
----------------------------------
पैसे मिळवणे कठीण
तुमच्याकडून चुकून गोपनीय क्रमांक, ओटीपी दिला गेला असेल तर बँकेकडून फसवणूक झालेली रक्कम रीफंड केली जात नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यात विविध मर्चेंट/वॉलेटमध्ये पैसे गेलेले असतात. सायबर चोरटे पैसे लगेच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करून नंतर ते काढून घेतात. त्यामुळे हे पैसे मिळणे अवघड जाते. त्याचबरोबर पैसे खात्यातून काढले गेल्यावर लगेच स्थानिक पोलिस ठाणे, सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलिसांकडून तातडीने संबंधित मर्चेंट/वॉलेट अथवा बँकेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून तुमचे पैसे गोठविण्यास सांगतात.
--------------------------------------
कोणतीही बँक अथवा बँक अधिकारी ग्राहकांना फोन करून केवायसी अपडेट करा, असे सांगत नाही. सायबर चोरट्यांनी गंडा घालण्याचा नवा फंडा शोधला आहे. त्यामुळे कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका. याबाबत जाहिरात फलकांमधून जनजागृती केली जात आहे.
- नितीन ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

