

‘बेस्ट’ने आत्मनिर्भर व्हावे!
मुख्यमंत्री फडणवीस; १५७ नवीन इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ‘बेस्ट’च्या परिवहन विभागाला सध्याच्या स्पर्धेच्या काळात उत्पन्नासाठी केवळ तिकीटविक्रीवर अवलंबून राहता येणार नाही. त्यांना उत्पन्नाचे नवे स्राेत निर्माण करून स्वत:च्या पायावर भक्कम उभे राहावे लागेल, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा फायद्यात नसते; पण योग्य नियोजन आणि नव्या संधींचा लाभ घेतल्यास ‘बेस्ट’ला आत्मनिर्भर करता येईल, असा विश्वास व्यक्त करून मुंबई महापालिकेकडून बेस्टला सातत्याने मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे त्यांनी कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज कुलाबा येथील बेस्टच्या मुख्यालयात १५७ नवीन इलेक्ट्रिक एसी बसचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होत्या.
राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीतून बेस्टमध्ये इलेक्ट्रिक बससेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. नव्या बसमुळे कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
----
बेस्ट बससेवा ही मुंबईची शिरोरेखा आहे. पूर्वी ट्राम आणि बग्ग्या धावायच्या. आता काळाच्या गरजेनुसार इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावत आहेत. ही फक्त वाहतुकीतील सुधारणा नाही, तर प्रदूषणमुक्त मुंबईच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
-------
यापुढेही आर्थिक पाठबळ कायम!
आर्थिक अडचणीच्या काळात महापालिकेने कर्मचाऱ्यांचे वेतन, बोनस आणि देणी भागवण्यासाठी वेळोवेळी मदत केली आहे. यापुढेही गरज पडल्यास बेस्टला आर्थिक पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
...................
सरकारमुळे ‘बेस्ट’ला
नवसंजीवनी : शिंदे
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, की महाविकास आघाडीच्या काळात बेस्ट उपक्रम डबघाईला आला होता; मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर बेस्टला नवसंजीवनी मिळाली.
- मुंबई महापालिकेने आतापर्यंत ३,४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत बेस्टला दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- भविष्यातही बेस्टला आवश्यक आर्थिक सहाय्य देण्यात यावे, यासाठी आयुक्त भूषण गगराणी यांनी विशेष लक्ष द्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.