ठाण्यात शिंदे गट, भाजपचे शक्तीप्रदर्शन
ठाण्यात शिंदे गट, भाजपचे शक्तीप्रदर्शन
छटपूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीय मतदारांना साद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी हालचालींना गती दिली असून, दिवाळीनंतर साजऱ्या झालेल्या छट पूजेच्यानिमित्ताने या स्पर्धेला अधिक रंग चढला आहे.
ठाण्यातील विविध भागांत महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. या ठिकाणी स्थानिक नागरिक आणि आयोजकांनी उत्तर भारतीय भाविकांसाठी सोयीसुविधांची व्यवस्था केली होती. याआधी उपवन तलावावर मुख्य छट पूजेचे आयोजन होत असले तरी यंदा रायलादेवीसह इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पूजाविधी पार पडले. शिंदे सेनेकडून उत्तर भारतीय मतदारांशी संवाद वाढवण्यासाठी उत्तर भारतीय सेल स्थापन करण्यात आला आहे. याआधीही उत्तर प्रदेश दिन, होळी आणि रंगपंचमीसारख्या सणांच्या आयोजनातून पक्षाने या मतदारांशी संपर्क साधला आहे.
रायलादेवी तलावावरील मुख्य पूजाविधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रात सर्व धर्म आणि सण एकत्र साजरे करण्याची परंपरा कायम राहील, असे सांगत अयोध्येला गंगा आरती केल्याचे समाधान व्यक्त केले. त्यांच्या भाषणातूनच आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही छट पूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याची मोहीम सुरू आहे. संजय केळकर आणि इतर भाजप नेते ठाण्यातील विविध ठिकाणी आयोजित पूजाविधींना उपस्थित राहून शुभेच्छा देताना दिसले.
उत्तर भारतीय मतदारसंघावर लक्ष
ठाण्यातील इंदिरानगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, मानपाडा, आझादनगर, कळवा, दिवा, मुंब्रा आदी परिसरांमध्ये गेल्या काही वर्षांत उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. स्थानिक नेत्यांच्या मते ही संख्या सुमारे ३.५ लाखांपर्यंतपोहोचली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाला दोन्ही पक्षांकडून ‘राजकीय पूल’ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

