मुरबाड रेल्वेचे १७५ वर्षांचे अपूर्ण स्वप्न!

मुरबाड रेल्वेचे १७५ वर्षांचे अपूर्ण स्वप्न!

Published on

सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. २९ : मुरबाड तालुका हा आपल्या ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक चळवळींसाठी प्रसिद्ध आहे. अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक आणि द्रष्टे नेते घडवणाऱ्या या भूमीला आजही रेल्वेचे स्वप्न साकार झालेले नाही. ब्रिटिश काळातच १८४६ मध्ये या भागातून रेल्वे मार्ग काढण्याचा विचार झाला होता. मात्र, तब्बल १७५ वर्षांनंतरही मुरबाडकरांच्या वाट्याला रेल्वे नाही, ही खंत आजही कायम आहे.
ब्रिटिशकाळात १६ एप्रिल १८५३ मध्ये मुंबई-ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली आणि १ मे १८५४ रोजी ती कल्याणपर्यंत पोहोचली. परंतु, त्यापूर्वीच १ सप्टेंबर १८४६ च्या ब्रिटिश अहवालात मुरबाड-माळशेज रेल्वेचा तपशीलवार अभ्यास नोंदवला गेला. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी रिपोर्ट मॅप्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अहवालात मुरबाड मार्गाचे सर्वेक्षण, नकाशे आणि खर्चाचा अंदाज नमूद केला होता. तत्कालीन अभियंता जी. टी. क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड-माळशेज घाट मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. ब्रिटिश अधिकारी चॅपमन यांनी या घाटातून रेल्वे मार्ग जावा यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांना माळशेजचा निसर्ग विशेष प्रिय होता आणि त्यांनीच “हा मार्ग सर्वात व्यवहार्य आहे” असा आग्रह धरला होता. मुंबई-चोण-मुरबाड-कोलठण-काळू नदीकाठ-खापरी-न्याहाडी-मोरोशी-खुबी-माळशेज-आळेफाटा-मद्रास-कलकत्ता, असा प्रस्तावित मार्ग होता. या मार्गासाठी प्रति मैल १२ ते १५ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. सहा बोगदे आणि १६४ फूट उंच पर्वतकडा खोदावी लागणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत खर्चिक ठरेल, असा निष्कर्ष अभियंता जेम्स बर्कले यांनी काढत प्रस्ताव फेटाळला. आणि मुरबाड रेल्वेचे स्वप्न पहिल्यांदाच धुळीस मिळाले.

रेल्वेचे जनक मुरबाडचे सुपुत्र
भारतीय रेल्वे संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे जगन्नाथ नाना शंकरशेठ हे मुरबाडचेच सुपुत्र होते. त्यांच्या पूर्वजांना पेशवाई काळात मुरबाडची पोतदारी बहाल करण्यात आली होती. १८४५ मध्ये त्यांनी जमशेदजी जीजीभाय यांच्यासह भारतीय रेल्वे संघाची स्थापना केली. मुंबईच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले; पण त्यांच्या जन्मभूमीला रेल्वे मिळण्यात अपयश आले, ही काळाची विडंबना ठरली.

१९३० मधील नाणेघाट योजना
१९३० मध्ये नाणेघाट ट्रान्स्पोर्ट कंपनीने मुरबाड-माळशेज रेल्वे मार्ग पुन्हा उभारण्याचा प्रयत्न केला. वैशाखरे गावातील जमीन त्यासाठी विकतही घेण्यात आली, याचे पुरावे आजही सातबाऱ्यावर दिसतात. मात्र, आर्थिक अडचणींमुळे ही योजना कोलमडली.

स्वातंत्र्यानंतरची अवस्था
स्वातंत्र्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी संसदेत आणि विधानसभेतून मुरबाड रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला. स्थानिक जनतेनेही सातत्याने मागणी केली; परंतु हा प्रकल्प आजही लालफितीत अडकलेला आहे.

रेल्वेची गरज अधिक भासतेय
मुरबाड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे अत्यावश्यक आहे. या मार्गामुळे शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात मोठा विकास घडू शकतो. विशेषतः माळशेज घाट आणि निसर्ग पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

मुरबाड रेल्वे हा इतिहासातील नोंदींनी सिद्ध झालेला प्रकल्प आहे. रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. जगन्नाथ नाना शंकर शेठ यांची जन्मभूमी ही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आहे, असे असूनही दीडशे वर्षांनंतर रेल्वेची येथे प्रतीक्षा आहे. सातासमुद्रापार असलेल्या ब्रिटिश अधिकारी चॅपमन यांचे हे स्वप्न साकार होणे ही काळाची गरज आहे.
- योगेंद्र बांगर, इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com