रोहारोहा अष्टमी अर्बन बँक मालमत्ता लिलावप्रकरणी ठेवीदार संतप्त

रोहारोहा अष्टमी अर्बन बँक मालमत्ता लिलावप्रकरणी ठेवीदार संतप्त

Published on

रोहा अष्टमी अर्बन बँक मालमत्ता लिलावप्रकरणी ठेवीदार संतप्त
स्थगिती न मिळाल्याने १९ नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा
रोहा, ता. २९ (प्रतिनिधी) : रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारत व जागेच्या लिलाव प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याच्या आरोपांमुळे निर्माण झालेली खळबळ अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. सहकार विभागाने लिलाव रद्द करण्याचे आदेश दिले असतानाही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आजअखेर या प्रक्रियेला अधिकृत स्थगिती दिलेली नाही. उलटपक्षी संबंधित बिल्डरचे नाव थेट बँकेच्या प्रॉपर्टी कार्डवर चढवण्यात आल्याने सहकारमंत्र्यांच्या आदेशांना प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप रोहेकरांकडून होत असून, यामागे राजकीय आश्रयाचा संशय अधिकच गडद होत आहे.
बँकेची मालमत्ता जवळपास चार कोटी रुपयांची असताना अवघ्या एक कोटी १० हजार रुपयांत ती विकण्यात आल्याचा आरोप भागभांडवलदारांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बोली प्रक्रिया सुरू असताना संबंधित बिल्डरचे नातेवाईक बँकेचे डिफॉल्टर असल्याची बाबही समोर आली; तरीही बोलीत फेरफार करून ही जमीन कवडीमोल भावाने विकली गेल्याचा ठपका कस्टोडियन नीलेश शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या अनियमिततेबाबत सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी जानेवारी महिन्यातच चौकशीचे आदेश देत पत्र पाठवले होते. मात्र त्यानंतर कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने भागभांडवलदार व ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांना देण्यात आलेल्या पत्रात बँक इमारत व्यवहार तत्काळ रद्द करण्यात यावा आणि कस्टोडियन नीलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत कारवाई न झाल्यास १९ नोव्हेंबरपासून आंदोलनकर्ते उपोषणाला बसणार असल्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ११ जूनला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत लिलाव स्थगितीचे आदेश देण्यात आले होते. मात्र साडेचार महिने उलटूनही आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनाने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप ‘रोहा बँक इमारत बचाव समिती’ने केला आहे. दरम्यान, या आंदोलनाला रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघानेही पाठिंबा दर्शविला आहे. महासंघाचे अध्यक्ष ॲड. जे. टी. पाटील यांनी पाठिंबा पत्र जिल्हा उपनिबंधकांना सादर केले. या वेळी उपाध्यक्ष दिलीप जोशी, सचिव योगेश मगर, वैभव साबळे, नितीन परब, शैलेश रावकर, संदीप सरफळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com