

उत्तनमध्ये कातकरी मुलांचे शोषण
श्रमजीवी संघटनेच्या मदतीने चौघांची मुक्तता
वाडा, ता. २९ (बातमीदार) ः देशाच्या संविधानानुसार सक्तीचे आणि मोफत शालेय शिक्षण घेण्याच्या वयात अल्पवयीन कातकरी मुला-मुलींकडून जबर श्रमाचे काम लावून राबवून घेत त्यांचे शोषण केल्याच्या दोन बालमजुरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. श्रमजीवी संघटनेतर्फे संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार मुलांची मुक्तता करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गौरापूर येथील सहावर्षीय मुलगा आणि पालघर तालुक्यातील वडाचा पाडा बहाडोली या भागातील १२ ते १६ वयोगटातील तीन मुली अशा बालमजुरीच्या दोन घटना श्रमजीवी संघटनेच्या सजगतेमुळे उघडकीस आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील उत्तन (भाईंदर) परिसरात अल्पवयीन कातकरी मुले आणि मुलींना फसवून त्यांच्या दारिद्र्याचा फायदा घेत बदल्यात जबरदस्तीने कामावर ठेवण्याचे दोन भयावह बालमजुरीचे प्रकार उघडकीस आले. श्रमजीवी संघटनेच्या तत्पर हस्तक्षेपामुळे या दोन्ही प्रकरणांत संबंधित कातकरी बालकांची सुटका करण्यात आली असून आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
...
हजार रुपयांच्या बदल्यात राबवले
गौरापूरमधील सहावर्षीय मुलाला, त्याच्या आजीने प्रवासासाठी घेतलेल्या केवळ १,००० रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात उत्तन येथील ‘वाणी’ नावाच्या दुकानदाराने जबरदस्तीने कामावर ठेवले होते. आजीने विरोध केला तरी दुकानदाराने मुलाला दुकानातच थांबवून त्याच्याकडून सतत अतिश्रमाची कामे करून घेतली. हा प्रकार बालकाच्या आजीने श्रमजीवी संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष भरत जाधव आणि सचिव सूरज दळवी यांना सांगितल्यावर उघड झाला.
...
तीन मुलींना तीन महिने त्रास
दुसरी घटना पालघर तालुक्यातील बहाडोली वडाचापाडा येथील १२ ते १६ वयोगटातील तीन अल्पवयीन कातकरी मुलींना घरकाम आणि मच्छी सुकवण्याचे काम आहे, चांगला पगार मिळेल, असे आर्थिक प्रलोभन दाखवून पालकांना दोन ते सहा हजार रुपयांचा बयाना देऊन त्या मुलींना उत्तन भाईंदर येथे नेण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्याकडून जबरदस्तीने मच्छी सुकवण्याचे, मच्छीच्या पाट्या उचलण्याचे आणि घरकामाचे श्रम करून घेतले जात होते. त्यांना घरी येऊ दिले जात नव्हते, तसेच संपर्क साधण्यासही मनाई होती. पीडित मुलीच्या वडिलांनी ही बाब श्रमजीवी संघटनेच्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांना सांगितली. त्यानंतर संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, संघटक सचिव सीता घाटाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर तालुकाध्यक्ष उल्हास पाटील व सचिव हिना वनगा, कार्यकर्त्या रेणुका पागी यांनी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी धाड टाकून आरोपी आबेल आणि मनाली मन्या वाघ या दोघींना ताब्यात घेतले व तीन मुलींची सुटका केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
...
सातत्याने लढा देऊ!
बालकांच्या हक्काचे बालपण परत देण्यासाठी सरकारने तत्काळ सर्व कातकरी मुलांना आश्रमशाळांमध्ये दाखल करणे आवश्यक आहे. आम्ही हा गुन्हा न्यायालयीन पातळीपर्यंत नेऊ आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सातत्याने लढा देऊ, अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.