कल्याण ग्रामीण विधानसभेत १७ हजाराहून अधिक दुबार मतदार

कल्याण ग्रामीण विधानसभेत १७ हजाराहून अधिक दुबार मतदार

Published on

दुबार मतदारांचा स्फोट
दिव्यात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात भाजपा आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, कार्यकर्त्यांच्या पळवापळवीसोबतच आता प्रभागातील याद्यातून मतदार खेचाखेचीदेखील सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच दिवा शहरात यादीत १७ हजारांहून अधिक दुबार मतदार असल्याची बाब भाजपा आणि ठाकरे गटाने उघड केल्याने एकच खळबळ माजली आहे. याबाबत भाजपा, मनसे, ठाकरे गट आणि शरद पवार गट यासंदर्भात निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची एकत्रित भेट घेणार असून पत्रही देणार आहेत. यामुळे दिव्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागण्याची चर्चा रंगू लागली आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदविल्याचे वास्तव भाजपा, मनसे आणि ठाकरे गटाने उघड केले. दिवा शहरातील उद्धव ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, भाजपचे दिवा शहर मंडल अध्यक्ष सचिन भोईर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, प्रभाग क्र. २७ आणि २८ क्षेत्रामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण १७ हजार २५८ इतकी दुबार नावे आढळली आहेत. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून, मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तत्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत आणि सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली होती. यानंतर कल्याण निवडणूक अधिकारी यांचीदेखील गुरुवारी (ता. २९) भेट घेण्यात येणार आहे. भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी दुबार आणि त्रिबार नावाच्या घोळावरून दिवा शहरातील राजकारणाला नवीन वळण लागण्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

दिव्यात शिंदे गटाचे वर्चस्व
ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात शिंदे गटाची ताकद आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातदेखील शिंदे गटाचा आमदार निवडून आल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. कल्याण ग्रामीणमधील प्रभागात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी शिंदे गटाच्या गोटातून हालचाली सुरू आहेत. यामुळेच शिंदे गटाविरोधात भाजप, ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गट एकत्रित झाल्याची ही चर्चा आता सुरू झाली आहे.

शिंदे गट विरुद्ध भाजपा सामना?
दिव्यात यापूर्वीही शिंदे गट विरुद्ध भाजपा असा सामना दिसून आला आहे. यातच शिंदे गट आणि भाजपा यांच्यात विविध विषयांवरून पटत नसल्याचेही समोर आले आहे. आता भाजपा, ठाकरे गट आणि मनसे यांनी शिंदे गटाविरोधात वारंवार विविध विषयांवरून आवाज उठविला असताना या दुबार मतदार नावांवरून पुन्हा एकदा हे एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारचे राजकारण घडू शकते, हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com