कोपरीतील आरोग्य मंदिराचा पर्दाफाश ; भाजप सेनेत जुंपली
कोपरीतील आरोग्य मंदिराचा पर्दाफाश; भाजप-सेनेत जुंपली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेला आपला दवाखाना बंद झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आली असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. या आरोग्य मंदिरांपैकी तीन मंदिरे बंद असल्याची बाब भाजप आमदार संजय केळकर यांनी उघडकीस आणली आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केळकर यांनी आपल्या मतदारसंघात निधी आणून विकासकामे करून दाखवावीत, अशी टीका केली आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्य मंदिरावरून भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना अधिक्र तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे.
आगामी पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र ठाणे शहरात दिसून येत आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष सुरू असताना, आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बंद झाल्याचा मुद्दा संजय केळकर यांनी लावून धरला. पालिकेनेदेखील संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे. दुसरीकडे आपला दवाखानाच्या जागी आरोग्य मंदिर सुरू करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार केळकर यांनी शहरातील तीन विविध आरोग्य मंदिरांना भेट दिली असता, ती बंद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओदेखील त्यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहेत. या माध्यमातून कोपरीतील सावकरनगर भागातील आरोग्य मंदिर बंद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. लोकप्रतिनिधींना अतिघाई का, असा सवालदेखील विचारला जाऊ लागला आहे.
प्रसूतिगृहाचा एनआयसीयू बंद
येथील दोनमजली प्रसूतिगृहातील दुसऱ्या मजल्यावरील एनआयसीयू विभागात लवकर जन्मलेल्या बालकांसाठी विशेष काळजी घेण्यासाठी २० इन्क्यूबेटर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, उद्घाटनानंतर सहा महिने उलटूनही हा विभाग सुरू करण्यात आलेला नाही.
स्वत:च्या मतदारसंघात निधी आणून दाखवा ः मालती पाटील
हे आरोग्य मंदिर अद्याप सुरू झालेले नाही. त्या ठिकाणी स्थापत्याची आतील कामे बाकी आहेत. याचे आधी केवळ भूमिपूजन करण्यात आले होते. त्याच्या लोकार्पणाला मात्र केळकर यांना आमंत्रण दिले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आधी तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी निधी मिळवा आणि विकासकामे करून दाखवा. विकासकामे करीत नसल्यानेच तुम्हाला अशी कामे सुचत असल्याची टीकाही त्यांनी केली.
जनआंदोलन उभारणार
या ठिकाणी केळकरांनी पाहणी केली असता, तेथे फीतही कापून ठेवल्याचे दिसून आले आहे. त्या आरोग्य मंदिराच्या बाजूला कचरा असल्याचेही आढळून आले आहे. या मुद्द्यावरून केळकर आक्रमक झाले. पालिकेने लोकप्रतिनिधींना खोटी माहिती दिली. ही आरोग्याची चेष्टा असून लवकरच याविरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

